ठाकरे गटात मोठी फूट पडणार? ठाकरेंचे खासदार शिंदेच्या संपर्कात, ‘नंदनवन’ बंगल्यावर हालचालींनी खळबळ…!

---Advertisement---

 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील काही खासदारांच्या हालचालींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांदरम्यान उद्धव ठाकरे यांनी संबंधित खासदारांना तातडीचा संदेश पाठवत आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे.

राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटातील काही खासदार स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे. तसेच या संदर्भात लोकसभा अध्यक्षांकडे पत्र दिले जाऊ शकते, असेही बोलले जात आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला आहे.

रविवारी उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला पक्षाच्या नऊ खासदारांपैकी चार खासदार प्रत्यक्ष उपस्थित होते, तर उर्वरित खासदारांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली.

बैठकीला प्रत्यक्ष अनुपस्थित राहिलेल्या ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाघचौरे, नागेश पाटील आष्टिकर, संजय देशमुख आणि संजय जाधव या खासदारांना उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्र संदेश पाठवला आहे. बैठकीला गैरहजर राहिल्यामुळे जनतेमध्ये आणि शिवसैनिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असल्याचे नमूद करत त्यांनी माध्यमांसमोर भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले आहे.

तसेच संबंधित खासदारांनी आपण पक्षासोबतच असल्याचे सार्वजनिकरित्या जाहीर करावे आणि पुढील काही दिवसांत प्रत्यक्ष भेटून चर्चा करावी, असेही ठाकरे यांनी संदेशात म्हटल्याचे समजते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानीही महत्त्वाच्या बैठका सुरू असल्याची चर्चा आहे. विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांनी शिंदे यांची भेट घेतल्याने राजकीय घडामोडींना आणखी वेग आला आहे. या भेटीत संभाव्य कायदेशीर आणि राजकीय पर्यायांवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

खासदारांच्या हालचाली आणि दोन्ही बाजूंनी सुरू असलेल्या बैठका यामुळे ठाकरे गटातील अंतर्गत परिस्थितीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आगामी काही दिवसांत या घडामोडींवरून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---