---Advertisement---
एल निनोच्या प्रभावामुळे यंदा मॉन्सूनचे आगमन उशीराने होत आहे. राज्यात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता कमी असून 20 जूननंतर पावसाचा जोर वाढू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात यंदा मान्सूनचे आगमन उशिरा होत असल्याने शेतकरी आणि सरकारची चिंता वाढली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाऊस आणि धरणांतील पाणीसाठ्याचा आढावा घेण्यात आला. पाऊस लांबल्यामुळे राज्यातील धरणांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. सध्या राज्यात 24.41 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे, तर गेल्या वर्षी याच काळात तो 31.10 टक्के होता. मान्सून चे आगमन अजून उशिराने झाले तर राज्यात पाणी टंचाईचे मोठे संकट येऊ शकते. त्यामुळे शासनाकडून पाणी बचतीचे आवाहन केले जात आहे.
राज्यात मुंबईसह काही शहरांमध्ये भविष्यात 20 टक्क्यांपर्यंत पाणीकपात करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्याच बरोबर सरकारने शेतकऱ्यांना घाईघाईने पेरणी न करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे. पाऊस स्थिर झाल्यानंतरच पेरणी करावी, अन्यथा दुबार पेरणीचे संकट निर्माण होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे.









