---Advertisement---
राज्यात हुंड्यासाठी विवाहितेचा अमानुष छळ केल्याच्या घटना काही केल्या कमी होत नाहीयेत. त्यातच एक धक्कादायक घटना कल्याणच्या वालधुनी परिसरात उघडकीस आली आहे. सासरच्या मंडळींनी विवाहितेवर मानसिक आणि शारीरिक अत्याचार करत तिचे टक्कल केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
कल्याण येथील एका तरुणासोबत पीडित महिलेचे नोव्हेंबर २०२५ मध्ये लग्न झाले होते. लग्नावेळी माहेरची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन हुंडा देणे शक्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र लग्नानंतर काही दिवसांतच सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी पीडित विवाहितेवर दबाव टाकण्यास सुरुवात झाली. पीडितेच्या म्हणण्यानुसार, गर्भवती असतानाही तिला योग्य जेवण दिले जात नव्हते. घरात वारंवार मारहाण, मानसिक त्रास, अपमानास्पद वागणूक, घरातलं जेवण फ्रिजमध्ये ठेवून देणं, अमानुष मारहाण करणं, गरम पाण्याने हात जाळणं, कोणत्याच गोष्टीसाठी पैसे न देणं आणि विविध प्रकारे छळ केला जात होता. तसेच गरम पाण्याने हात भाजल्याचाही आरोप तिने केला आहे.
आणि याहून धक्कादायक बाब म्हणजे, ७ जून रोजी डोक्यात उवा झाल्याचे कारण देत पीडित विवाहितेचे जबरदस्तीने टक्कल करण्यात आल्याचा आरोप पीडितेने केला आहे. या घटनेनंतर त्रास असह्य झाल्याने ती घरातून बाहेर पडून बहिणीकडे पोहोचली आणि आपल्या कुटुंबीयांना संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिला उपचारासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले. सध्या तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
या प्रकरणात संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे. पोलिसांकडून तक्रारीची चौकशी सुरू असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.









