---Advertisement---
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने गेल्या १२ वर्षांत विकास, सुशासन, जनकल्याण आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने उल्लेखनीय कामगिरी केली असल्याचे प्रतिपादन केंद्रीय युवा व क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी केले. मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देत सांगितले की, २०१४ पासून देशात विकासाला नवी दिशा मिळाली असून जनतेच्या विश्वासामुळे सलग तिसऱ्यांदा केंद्रात एनडीए सरकार सत्तेवर आले आहे. सरकारने गरीब, शेतकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांना केंद्रस्थानी ठेवून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.
खडसे यांनी सांगितले की, प्रधानमंत्री जनधन योजनेद्वारे कोट्यवधी नागरिकांना बँकिंग व्यवस्थेशी जोडण्यात आले. आयुष्मान भारत, उज्ज्वला, प्रधानमंत्री आवास, जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत अभियानासारख्या योजनांमुळे सर्वसामान्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल झाला आहे.
शेतकरी कल्याणासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत थेट आर्थिक मदत दिली जात असून किसान क्रेडिट कार्ड योजनेद्वारे शेतकऱ्यांना सुलभ कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी लखपती दीदी, सुकन्या समृद्धी यांसारख्या योजनांनी मोठे योगदान दिल्याचे त्यांनी नमूद केले.
पायाभूत सुविधांच्या विकासाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, गेल्या १२ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारले आहे. ग्रामीण रस्ते, रेल्वे आधुनिकीकरण, वंदे भारत एक्सप्रेस, मेट्रो सेवा, नवीन विमानतळ तसेच डिजिटल कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून देशाच्या विकासाला गती मिळाली आहे.
देशाच्या सुरक्षेबाबत बोलताना त्यांनी सर्जिकल स्ट्राईक, सीमावर्ती भागातील विकासकामे आणि संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेचा उल्लेख केला. तसेच भारताने जागतिक स्तरावरही आपली वेगळी ओळख निर्माण केली असून जी-२० अध्यक्षपद, आंतरराष्ट्रीय योग दिन आणि विविध देशांशी वाढलेले संबंध हे त्याचे उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले.
सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी आणि राष्ट्रीय अभिमान वृद्धिंगत करण्यासाठी केंद्र सरकारने अनेक उपक्रम राबविल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कर्तव्य पथ, स्टॅच्यू ऑफ युनिटी, नवीन संसद भवन, राष्ट्रीय युद्ध स्मारक आणि आदिवासी समाजातील महानायकांच्या सन्मानार्थ राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा त्यांनी उल्लेख केला.
रक्षाताई खडसे म्हणाल्या की, मोदी सरकारची १२ वर्षांची वाटचाल ही केवळ योजनांची अंमलबजावणी नसून विकसित भारताच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरविण्याचा एक व्यापक प्रयत्न आहे. जनतेच्या विश्वासाच्या बळावर देश आत्मनिर्भरता, सुशासन आणि सर्वसमावेशक विकासाच्या दिशेने वेगाने पुढे जात असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.









