सरसकट कर्जमाफीसाठी शेतकऱ्याचे अनोखे आंदोलन; जिवंतपणी स्वतःची अंत्ययात्रा काढत घेतली जलसमाधी….!

---Advertisement---

 

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात एका शेतकऱ्याने अत्यंत अनोखे आणि लक्षवेधी आंदोलन केले. सैताने येथील शेतकरी प्रमोद पाटील यांनी स्वतःची जिवंतपणी अंत्ययात्रा काढत विहिरीत जलसमाधी घेण्याचा प्रयत्न करून शासनाच्या शेतकरी धोरणांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

सरसकट शेतकरी कर्जमाफी, सातबारा कोरा करणे तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्रमोद पाटील यांनी हे आंदोलन छेडले. गावातून ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणाबाजी करत त्यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर त्यांनी विहिरीत उतरून जलसमाधी आंदोलन केले.

या आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. आंदोलनामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. प्रमोद पाटील यांना समजावून सांगण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाला मोठी कसरत करावी लागली.

प्रमोद पाटील यांच्या या आंदोलनाला पंचक्रोशीतील शेतकरी, शेतमजूर आणि युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांमुळे सर्वसामान्य शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून त्याच्यावर मरणाची वेळ ओढवली असल्याची भावना आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

शेतमालाला हमीभाव, वाढते उत्पादन खर्च, कर्जाचा बोजा आणि नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी हतबल झाला आहे. अशा परिस्थितीत सरकारने तातडीने सरसकट कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. प्रमोद पाटील यांच्या जिवंत अंत्ययात्रा आणि जलसमाधी आंदोलनाची जिल्हाभर चर्चा रंगली असून, शेतकऱ्यांच्या व्यथा आणि प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---