‘एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील’; ऑपरेशन टायगरनंतर शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा दावा, मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता…!

---Advertisement---

 

राज्यात ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेमुळे राजकीय वातावरण तापले असताना, शिवसेना (शिंदे गट) आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मोठे विधान करत आगामी राजकीय घडामोडींचे संकेत दिले आहेत. ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटात दाखल होणार असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भविष्यात एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील, असा दावा केला आहे.

माध्यमांशी बोलताना भोंडेकर म्हणाले, “ऑपरेशन टायगरमुळे एकनाथ शिंदे यांची ताकद वाढणार आहे. पक्षाची ताकद वाढल्याने त्यांची राजकीय भूमिका अधिक मजबूत होईल. भविष्यात ते मुख्यमंत्री होतील, तर देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय पातळीवर देशाचे नेतृत्व करतील.”

ठाकरे गटातील खासदारांच्या संभाव्य पक्षांतरावर भाष्य करताना भोंडेकर यांनी सूचक शब्दांत दावा केला की, “आमचे ऑपरेशन फक्त काही दिवसांचे नसते, ते 365 दिवस चालते. उद्धव ठाकरे यांना स्वतःचे आमदार आणि खासदार सांभाळता येत नाहीत. किती खासदार आमच्याकडे येणार हे आत्ता सांगता येणार नाही, पण एक-दोन अपवाद वगळता अनेक जण संपर्कात आहेत.” त्यांनी पुढे सांगितले की, पक्षात येणाऱ्या कोणाच्याही स्वागतासाठी शिंदे गट तयार आहे.

ऑपरेशन टायगरबाबत बोलताना भोंडेकर म्हणाले, “हे ऑपरेशन आम्ही तयार केलेले नाही. काही लोकांना त्यांच्या सध्याच्या पक्षात समाधान मिळत नसल्यामुळे ते आमच्याकडे येण्याचा निर्णय घेत आहेत. आगामी काही दिवसांत आणखी घडामोडी घडू शकतात.”

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खासदारांना कथितरित्या आर्थिक प्रलोभने दिल्याचा आरोप केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना भोंडेकर यांनी हे आरोप फेटाळून लावले.

“15 कोटी रुपयांच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. भविष्यात संजय राऊत देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर आश्चर्य वाटणार नाही,” असा टोला त्यांनी लगावला.

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना भोंडेकर म्हणाले की, “फडणवीस सध्या राज्याचे प्रभावी नेतृत्व करत आहेत. मात्र भविष्यात ते राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका निभावू शकतात. त्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळतील.”

दरम्यान, ऑपरेशन टायगरच्या चर्चांमुळे महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना वेग आला असून, आगामी काळात आणखी मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---