---Advertisement---
जळगाव जिल्ह्यात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत चाळीसगाव नगर परिषदेतील शहर विकास आघाडीचे ११ नगरसेवक आणि दोन अपक्ष नगरसेवकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
चाळीसगाव येथे दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर करण्यात आला. स्वर्गीय माजी आमदार राजीव देशमुख यांच्या राजगड येथील निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांसह दोन अपक्ष नगरसेवक उपस्थित होते.
यावेळी निर्णयामागील भूमिका स्पष्ट करताना अपक्ष नगरसेविका सायली जाधव यांचे पती रोशन जाधव यांनी सांगितले की, भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराने मतदारांकडे साधे मत मागण्यासाठीही संपर्क साधलेला नाही. त्यामुळे अशा उमेदवाराला मतदान कसे करावे, असा प्रश्न आमच्यासमोर निर्माण झाला आहे.
निवडणुकीत उभे असलेल्या अपक्ष उमेदवारांनी एकामागून एक भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने लोकशाही प्रक्रियेची थट्टा होत असल्याची भावना निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शहर विकास आघाडीचे गटनेते दीपक पाटील, नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, ज्येष्ठ अपक्ष नगरसेवक राजेंद्र चौधरी तसेच रोशन जाधव यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत बहिष्काराची घोषणा केली.
यावेळी लोकनेते अनिल देशमुख, शहर विकास आघाडीचे सर्व नगरसेवक तसेच दोन्ही अपक्ष नगरसेवक उपस्थित होते. या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीच्या राजकीय समीकरणांवर काय परिणाम होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.









