यावलमध्ये तरुणाचा खून करून अपघाताचा बनाव; तीन मित्रांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल…!

---Advertisement---

 

यावल तालुक्यातील कोळन्हावी ते डांभुर्णी रस्त्यादरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पोलिस तपासात वेगळ्याच वळणावर पोहोचली आहे. सुरुवातीला अपघात म्हणून नोंद झालेल्या या प्रकरणात प्रत्यक्षात खून झाल्याचे समोर आले असून, मृत तरुणाच्या तीन मित्रांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत पवन रवींद्र सोळंके (वय 26, रा. कोळन्हावी) याला बुधवारी मध्यरात्रीनंतर काही तरुणांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी अज्ञात वाहनाच्या धडकेत त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. यानुसार अज्ञात वाहन चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

मात्र, पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत तपासाची सूत्रे हाती घेतली असता अनेक विसंगती आढळून आल्या. डीवायएसपी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे, पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन आणि गुन्हे शोध पथकाने सखोल तपास केला. तपासादरम्यान मृत्यू अपघातामुळे नसून मारहाण आणि दगडाने ठेचून केल्याचा संशय बळावला.

चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, पवन सोळंके आणि त्याचे मित्र बुधवारी रात्री पार्टीसाठी एकत्र आले होते. शेतातील पार्टी संपल्यानंतर काही जण घरी परतले. मात्र पवन आणि त्याचे तीन मित्र पुढे किनगाव परिसरात गेले. तेथून किनगाव-डांभुर्णी मार्गावरील पाटचारीवर गेल्यानंतर त्यांच्यात वाद झाला. या वादातून पवनला मारहाण करण्यात आली आणि त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले.

घटनेनंतर आरोपींनी अपघाताचा बनाव रचून मृत्यू अज्ञात वाहनाच्या धडकेत झाल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या तपासामुळे संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला.

या प्रकरणी उमेश दिलीप परदेशी (रा. कोळन्हावी), चेतन मोतीराम कोळी आणि लोकेश दिवाकर महाजन (दोघे रा. डांभुर्णी) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकानेही तपास केला असून पुढील तपास यावल पोलीस करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---