---Advertisement---
अमळनेर शहरातील इदगाह रस्त्यावरील मुस्लिम कब्रस्तानाजवळ झालेल्या भीषण अपघातात एका अनोळखी वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी अमळनेर पोलिसांनी नागरिकांचे सहकार्य मागितले आहे.
सोमवारी सकाळी सुमारे ८.१८ वाजेच्या दरम्यान इदगाह रस्त्यावर मुस्लिम कब्रस्तानाजवळ एक वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी अवस्थेत आढळून आली. प्राथमिक तपासात अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी व्यक्तीस तातडीने अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून मृतदेह ग्रामीण रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणी अमळनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अपघातास कारणीभूत असलेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. तसेच मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलिस विविध माध्यमांतून माहिती गोळा करत आहेत.
मृत व्यक्तीचे वय अंदाजे ६० ते ६५ वर्षे असून बांधा सडपातळ, रंग काळा, केस पांढरे, उंची अंदाजे ५ ते ५.५ फूट आणि बारीक पांढरी दाढी अशी ओळख आहे. त्यांच्या अंगावर लाल रंगाचा चेक्स असलेला पूर्ण बाह्यांचा शर्ट, काळ्या रंगाची पॅन्ट, गळ्यात पांढरा रुमाल तसेच निळ्या रंगाचे अंतर्वस्त्र व नाईट पॅन्ट परिधान केलेली होती.
सदर व्यक्तीबाबत कोणाला माहिती असल्यास अथवा त्यांची ओळख पटत असल्यास अमळनेर पोलिस स्टेशनशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच तपासी अंमलदार पोहेकॉ. विनोद लक्ष्मण सोनवणे यांच्या ८८८८८७५३२३ या क्रमांकावरही माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
अपघातातील मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू असून नागरिकांच्या सहकार्यामुळे या वृद्धाची ओळख समोर येण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.









