आईच्या डोळ्यासमोर घडली हृदयद्रावक घटना; शहापूर येथे वीज कोसळून युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू..!

---Advertisement---

 

अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे सोमवारी दुपारी झालेल्या वीज कोसळण्याच्या दुर्घटनेत एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. राकेश रतिलाल पाटील (वय 32) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

युवा शेतकरी राकेश पाटील हे आपल्या आईसह आणि मजुरांसोबत शेतातील कामासाठी गेले होते. दुपारी सुमारे 12 वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यावेळी आपली मोटारसायकल सुरक्षित ठिकाणी रस्त्यालगत लावण्यासाठी राकेश घाईने निघाले होते. मात्र अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या दुर्घटनेवेळी राकेश यांची आई आणि काही मजूर जवळील निंबाच्या झाडाखाली उभे होते. आईच्या डोळ्यासमोरच मुलाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. घटनेनंतर आईचा आक्रोश उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू आणणारा होता.

वीज कोसळण्याचा फटका इतका तीव्र होता की राकेश यांच्या अंगावरील कपडे तसेच गळ्यातील रुमालही जळाल्याचे दिसून आले. दुर्घटनेनंतर त्यांना तातडीने अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेची माहिती गावात पसरताच शोककळा पसरली. सायंकाळी उशिरा शहापूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राकेश पाटील यांचा विवाह चार वर्षांपूर्वी झाला होता. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. कर्त्या तरुणाच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावकऱ्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---