---Advertisement---
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवरील लैंगिक अत्याचार आणि निर्घृण हत्या प्रकरणात पुणे विशेष न्यायालयाने आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे याला दोषी ठरवले आहे. या निर्णयानंतर आता आरोपीला कोणती शिक्षा होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. विशेष न्यायालयाने शिक्षेबाबतचा अंतिम निर्णय 29 जून रोजी जाहीर करण्याचे निश्चित केले आहे.
1 मे 2026 रोजी घडलेल्या या धक्कादायक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. आरोपीने खाऊ देण्याच्या बहाण्याने चिमुरडीला सोबत नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता. त्यानंतर तिची हत्या करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवण्यात आला होता. तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली होती.
या प्रकरणाची सुनावणी जलदगतीने पार पडली. गुरुवारी विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवत त्याच्यावरील विविध कलमांखालील गुन्हे सिद्ध झाल्याचे नमूद केले.
अंतिम सुनावणीदरम्यान न्यायालयाने आरोपीला शिक्षेबाबत आपली बाजू मांडण्याची संधी दिली. त्यावेळी आरोपीने आपण मुलीला खाऊ देण्यासाठी घेऊन गेलो होतो आणि अपघाताने ती जखमी झाल्याचा दावा केला. मात्र न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावत त्याच्याविरोधातील गुन्हे सिद्ध झाल्याचे स्पष्ट केले.
सरकारी पक्षाने न्यायालयात जोरदार युक्तिवाद करत हा गुन्हा अत्यंत क्रूर आणि अमानुष स्वरूपाचा असल्याचे नमूद केले. वैद्यकीय अहवाल आणि तपासातील पुराव्यांच्या आधारे लैंगिक अत्याचार सिद्ध झाल्याचे सांगत आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली आहे.
या खटल्यात आरोपीविरोधातील काही कलमांमध्ये फाशीच्या शिक्षेची तरतूद असून इतर कलमांमध्ये जन्मठेप आणि दीर्घ कारावासाची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे 29 जून रोजी न्यायालय कोणती शिक्षा सुनावते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नसरापूर प्रकरणाने राज्यभर संतापाची लाट उसळली होती. पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी विविध स्तरांतून होत होती. आता आरोपी दोषी ठरल्यानंतर शिक्षेच्या निर्णयाची प्रतीक्षा सुरू झाली आहे.









