झाडी शिवारातून पाच गुरांची चोरी; मारवड पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल…!

---Advertisement---

 

अमळनेर तालुक्यातील झाडी शिवारात शेतातून पाच गुरांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि पशुपालकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

मारवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयूर सतीश पाटील (वय 28, रा. झाडी, ता. अमळनेर) यांच्या मालकीची गुरे गट क्रमांक 321/4 मधील शेतात बांधलेली होती. 24 जून रोजी रात्री सुमारे 8 वाजता त्यांनी गुरांना चारा-पाणी करून घरी परतले होते.

मात्र 25 जून रोजी सकाळी 6 वाजता शेतात आल्यानंतर दोन गायी, एक बैल आणि दोन वासरे बांधलेल्या ठिकाणी नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर फिर्यादी, त्यांचे नातेवाईक आणि मित्रांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला. मात्र गुरांचा कोणताही मागमूस लागला नाही.

अखेर अज्ञात चोरट्यांनी गुरांची चोरी केल्याची खात्री झाल्यानंतर मारवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. चोरीस गेलेल्या जनावरांमध्ये एक राखाडी रंगाचा बैल, एक लाल-तपकिरी रंगाची गाय, एक पांढरी गाय, एक काळ्या रंगाचे वासरू आणि एक लाल-तपकिरी रंगाचे वासरू यांचा समावेश आहे. चोरीस गेलेल्या पाचही जनावरांची एकूण अंदाजित किंमत 31 हजार रुपये असल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे.

या प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात सीसीटीएनएस क्रमांक 119/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) अंतर्गत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार संजय सूर्यवंशी करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---