---Advertisement---
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या एका होतकरू तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी (दि. १७) घडली. बबलू तालेब पठाण (वय २४, रा. नांदगाव तांडा, ता. सोयगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.
सोयगाव तालुक्यातील नांदगाव तांडा येथील रहिवासी असलेला बबलू पठाण हा पोलीस भरतीसाठी धुळे येथे जाण्यासाठी घरातून निघाला होता. मात्र, शिरूर चौफुली परिसरात त्याचा अपघात झाला आणि त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून, नांदगाव तांड्यावर शोककळा पसरली आहे.
मृत बबलू हा शेतकरी कुटुंबातील होता. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून, अवघ्या तीन एकर शेतीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. कुटुंबाची जबाबदारी ओळखून बबलूने पोलीस भरतीसाठी कठोर परिश्रम घेतले होते. त्याने आपल्या स्वप्नासाठी वैयक्तिक आयुष्यही मागे ठेवत विवाह पुढे ढकलला होता. कुटुंबियांच्या इच्छेनुसार त्याचा साखरपुडा देखील झाला होता.
शुक्रवारी नमाज अदा केल्यानंतर तो धुळेच्या दिशेने निघाला असताना हा अपघात घडला. या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावातील आणि परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृतदेहावर नांदगाव तांडा येथील दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. एका मेहनती आणि होतकरू तरुणाचे स्वप्न अपूर्ण राहिल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.









