मोठी बातमी: आता विज्ञानातील चमकदार कामगिरी नेणार थेट ‘नासा’च्या दारी; राज्य सरकारचा मोठा निर्णय!

---Advertisement---

 

जळगाव/मुंबई:
राज्यातील शालेय विद्यार्थ्यांमधील संशोधक वृत्तीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ या नव्या उपक्रमांतर्गत विज्ञान प्रदर्शनांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता थेट भारताची अंतराळ संस्था ‘इस्रो’ (ISRO) आणि अमेरिकेची ‘नासा’ (NASA) पाहण्याची संधी मिळणार आहे.

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी या योजनेची अधिकृत घोषणा केली असून, यासाठी ३.३० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरीही दिली आहे.

अशी असेल ही ‘विज्ञान वारी’ (निवड प्रक्रिया):
विद्यार्थ्यांच्या कामगिरीनुसार त्यांना वेगवेगळ्या स्तरावर ही संधी उपलब्ध करून दिली जाईल:

तालुका स्तर: तालुका स्तरावरील प्रदर्शनात प्रथम येणाऱ्या २,१४८ विद्यार्थ्यांना राज्यातील जवळच्या विज्ञान केंद्रांना भेट देता येईल.

जिल्हा स्तर: जिल्हा स्तरावर निवड झालेल्या १८० विद्यार्थ्यांना बंगळुरू येथील ‘इस्रो’ केंद्र पाहता येईल.

राज्य स्तर: राज्य स्तरावरील प्रदर्शनात बाजी मारणाऱ्या ५१ गुणवंत विद्यार्थ्यांना थेट अमेरिकेतील ‘नासा’ केंद्राला भेट देण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. (यामध्ये इयत्ता ६ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांचा समावेश असेल).


१. वैज्ञानिक दृष्टिकोन: विद्यार्थ्यांमध्ये तर्कशुद्ध विचार आणि समस्या सोडवण्याचे कौशल्य विकसित करणे.
२. प्रत्यक्ष अनुभव: प्रगत संशोधन संस्था कशा प्रकारे कार्य करतात, याचा विद्यार्थ्यांना जवळून अनुभव मिळावा.
३. NEP २०२० ची अंमलबजावणी: नवीन शैक्षणिक धोरणानुसार अनुभवाधारित शिक्षणावर भर देणे.

या उपक्रमासाठी तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर विशेष समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समिती आणि राज्याच्या अर्थसंकल्पातून यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
“या उपक्रमामुळे राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक जिज्ञासेला चालना मिळेल आणि भविष्यात देशासाठी उत्तम संशोधक घडण्यास मदत होईल,” असा विश्वास दादाजी भुसे यांनी व्यक्त केला आहे.

विद्यार्थ्यांसाठी आवाहन: जर तुम्हाला विज्ञानाची आवड असेल आणि तुम्ही नाविन्यपूर्ण प्रयोग करत असाल, तर सज्ज व्हा! तुमची एक छोटीशी कल्पना तुम्हाला थेट अमेरिकेची वारी घडवून आणू शकते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---