---Advertisement---
पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सलग तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला (TMC) विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसल्यानंतर आता पक्षात उभी फूट पडण्याचे संकेत मिळत आहेत.
दिग्गज नेत्यांच्या पराभवाने पक्ष खचला
यंदाच्या निवडणुकीत ममता बॅनर्जींचा करिष्मा चालला नाही. भाजपने २०० हून अधिक जागांवर विजय मिळवत टीएमसीला मोठा धक्का दिला आहे. चंद्रिमा भट्टाचार्य, शशी पांजा, अरूप बिस्वास, सुजीत बोस आणि ब्रात्य बसू यांसारख्या दिग्गज नेत्यांना आपला मतदारसंघ वाचवता आला नाही. या पराभवामुळे पक्ष अंतर्गत पातळीवर खचल्याचे चित्र आहे.
बैठकीला १० आमदारांची दांडी
निकालानंतर ममता दीदींनी बुधवारी आपल्या निवासस्थानी सर्व आमदारांची तातडीची बैठक बोलावली होती. मात्र, त्यांच्या जवळच्या १० आमदारांनी या बैठकीला दांडी मारली. काही आमदारांनी हिंसाचार आणि वैयक्तिक कारणांचे निमित्त दिले असले, तरी पक्षात सर्व काही आलबेल नसल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
अंतर्गत कलह उफाळला
कुचबिहार: वरिष्ठ नेते रवींद्रनाथ घोष यांनी उदयन गुहा यांच्यावर भाजपला मदत केल्याचा आरोप करत त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे.
फरक्का: माजी आमदार मोनिरुल इस्लाम यांनी तिकीट नाकारल्याने नाराजी व्यक्त करत पक्षावर टीकेची झोड उठवली आहे.
पक्ष वाचवण्याचे मोठे आव्हान
एकीकडे ममता बॅनर्जींनी पराभवाचे खापर निवडणूक आयोगावर फोडले असून इंडिया ब्लॉकशी संपर्क साधला आहे, तर दुसरीकडे भाजप पक्षात मोठी फूट पाडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. बंगालची वाघीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ममता बॅनर्जींसमोर आता स्वतःचा पक्ष एकसंघ ठेवण्याचे सर्वात मोठे आव्हान उभे ठाकले आहे.









