---Advertisement---
यावल तालुक्यातील चुंचाळे-किनगाव, नायगाव-किनगाव तसेच चुंचाळे-नायगाव या मार्गांवरील रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेल्या काटेरी झुडपांमुळे वाहनधारक त्रस्त झाले होते. झुडपांनी रस्त्याला अक्षरशः विळखा घातल्याने रस्ता अरुंद झाला होता आणि प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता.
या गंभीर समस्येकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक आणि वाहनधारकांकडून केला जात होता. समोरून येणारी वाहने वेळेवर दिसत नसल्याने अपघातांचा धोका वाढला होता. मोठी वाहने समोर आल्यानंतर दुचाकीस्वारांना बाजूला सरकताना काटेरी झुडपांचा फटका बसत होता. त्यामुळे अनेकांना किरकोळ जखमा होत असून वाहनांचेही नुकसान होत असल्याच्या तक्रारी होत्या.
या समस्येबाबत दै. तरुण भारतमध्ये १२ मे रोजी वृत्त प्रकाशित होताच प्रशासन खडबडून जागे झाले. संबंधित रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेली काटेरी झुडपे हटवण्याचे काम आजपासून सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनधारक आणि नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
मात्र, केवळ झुडपे हटवून चालणार नाही तर चुंचाळे ते किनगाव मार्गावरील ठिकठिकाणी पडलेले खड्डेही तातडीने बुजवावेत, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. पावसाळ्यात या खड्ड्यांमुळे परिस्थिती अधिक धोकादायक बनत असल्याने प्रशासनाने याकडेही लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या समस्येला वाचा फोडून प्रशासनाला जाग आणल्याबद्दल दै. तरुण भारतचे परिसरातून कौतुक केले जात आहे.









