---Advertisement---
धुळे शहरात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर हजारो गोवंश कत्तल प्रकरणावर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी गोरक्षक विकास गोमसाळे यांनी सुरू केलेले आमरण उपोषण पाचव्या दिवशीही सुरू असून त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. तीव्र उष्णता आणि अन्न-पाण्याचा त्याग यामुळे त्यांची प्रकृती खालावत असल्याने समर्थकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात मोठ्या प्रमाणावर गोवंशाची कत्तल झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कत्तलीनंतरचे अवशेष शहरातील महापालिकेच्या कचरा डेपोत टाकण्यात येत असल्याचा दावा करण्यात आला. या संदर्भातील माहिती मिळाल्यानंतर विकास गोमसाळे यांनी संबंधित ठिकाणी जाऊन घडामोडींचे चित्रीकरण केल्याचे सांगितले जाते.
विकास गोमसाळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या प्रकरणाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित बाबी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. यामुळे नाराजी व्यक्त करत विकास गोमसाळे यांनी आमरण उपोषण सुरू केले. दोषींवर कायदेशीर कारवाई होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका त्यांनी जाहीर केली आहे.
उपोषणाचा कालावधी वाढत असल्याने त्यांच्या प्रकृतीची चिंता व्यक्त केली जात आहे. शहरातील तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने आरोग्यावर परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे. समर्थक आणि नागरिकांकडून प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी केली जात आहे. या प्रकरणी प्रशासनाकडून अधिकृत भूमिका आणि पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









