---Advertisement---
जळगाव तालुक्यातील दापोरा शिवारात मंगळवारी मध्यरात्री अवैध रेती उत्खननाविरोधात महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई केली. मात्र, या कारवाईदरम्यान वाळू माफियांनी प्रशासनालाच खुले आव्हान दिल्याचा प्रकार समोर आला आहे. घटनास्थळी मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित असतानाही काही डंपर पळवून नेण्यात आल्याचा आरोप होत असून या घटनेमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
स्थानिकांकाडून मिळालेल्या माहितीनुसार, दापोरा आणि धानोरा परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध रेती उपसा सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने मध्यरात्री छापेमारी केली. कारवाईदरम्यान काही डंपर ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू असतानाच गोंधळ निर्माण झाला.
स्थानिकांच्या आरोपानुसार, वाळू माफियांच्या साथीदारांनी प्रशासनाच्या उपस्थितीतच काही डंपर घटनास्थळावरून पळवून नेले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ घटनास्थळी उपस्थित होते. ग्रामस्थांनी असा आरोप केला आहे की, काही संशयितांनी तलवार, कुऱ्हाड आणि चॉपर यांसारखी धारदार हत्यारे दाखवत नागरिकांना धमकावले. काहींनी ग्रामस्थांच्या दिशेने धाव घेत दहशत निर्माण करण्याचाही प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणावर महसूल व पोलीस यंत्रणा उपस्थित असताना वाळू माफियांना डंपर घेऊन पसार होण्याचे धाडस कसे झाले, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणी संबंधित विभागांकडून अधिकृत माहिती समोर येणे अपेक्षित आहे. दोषींवर कठोर कारवाई करावी आणि अवैध रेती उत्खननाला आळा घालावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच वाळू माफियांच्या वाढत्या दादागिरीविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिक नागरिकांनी दिला आहे.









