---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. महसूल व कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक पंचनाम्यानुसार रावेर तालुक्यातील ८७ गावांमधील सुमारे १,५३५ हेक्टर क्षेत्रावरील केळी पीक जमीनदोस्त झाले असून तब्बल २,११४ शेतकरी बाधित झाले आहेत. या नुकसानीची अंदाजित रक्कम सुमारे ६५ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
दोन दिवसांपूर्वी सोमवारी सायंकाळी सहा ते सात वाजेदरम्यान आलेल्या वादळी वाऱ्याने अनेक भागांतील केळी बागा अक्षरशः आडव्या झाल्या. विशेषतः रावेर तालुक्यातील अजनाड, अहिरवाडी, खिरवड, केऱ्हाळे बुद्रुक, पाडळे खुर्द, निरूळ, मोहगण, तामसवाडी, रावेर आणि पातोंडी परिसरात मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे.
महसूल व कृषी विभागाने तयार केलेला प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. अहवालानुसार अजनाड येथे सर्वाधिक १०० हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून त्याखालोखाल अहिरवाडी (८६ हेक्टर), खिरवड (८५ हेक्टर), केऱ्हाळे बुद्रुक (८० हेक्टर), पाडळे खुर्द (७० हेक्टर), अटवाडे (७० हेक्टर), निरूळ (६५ हेक्टर) आणि इतर गावांमध्येही मोठ्या प्रमाणात नुकसान नोंदविण्यात आले आहे.
या अवकाळी वादळाचा फटका केवळ शेतीपुरता मर्यादित न राहता निवासी भागांनाही बसला आहे. महसूल विभागाच्या पंचनाम्यानुसार तालुक्यातील १५ घरांचे अंशतः नुकसान झाले असून त्याचीही नोंद करण्यात आली आहे.
मात्र, या नुकसानीचे अंतिम सर्वेक्षण सुरू असून बाधित शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. वादळामुळे केळी उत्पादकांच्या हाती आलेले पीक उद्ध्वस्त झाल्याने अनेक शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.









