---Advertisement---
पुणे:
वारकरी संप्रदायातील ‘घुसखोरी’च्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे मुख्य प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर पुणे जिल्ह्यातील आळंदी म्हातोबाची येथे हभप संग्राम महाराज भंडारे आणि त्यांच्या समर्थकांकडून शाईफेक करण्यात आली. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
विकास लवांडे हे हवेली तालुक्यातील आळंदी म्हातोबाची येथे आयोजित कार्यक्रम आणि प्रवचन आटोपून परतत असताना ही घटना घडली. हभप संग्राम भंडारे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी लवांडे यांची गाडी अडवली. “आमच्या गुरुवर्यांवर आणि संतांवर टीका खपवून घेतली जाणार नाही, तू लक्षात ठेव!” असे म्हणत भंडारे यांनी लवांडे यांच्या अंगावर काळी शाई ओतली आणि धक्काबुक्की केली.
या घटनेनंतर संतप्त झालेल्या विकास लवांडे यांनी थेट लोणी काळभोर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. “माझ्यावर हल्ला करणाऱ्यांकडे पिस्तूल होते आणि मला जीवे मारण्याचा त्यांचा डाव होता. हे वारकरी नसून वारकरी संप्रदायात घुसलेले गुंड आहेत,” असा गंभीर आरोप लवांडे यांनी केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करेपर्यंत त्यांनी पोलीस ठाण्यातच सत्याग्रह सुरू केला होता.
शाईफेकीमागचे कारण
काही दिवसांपूर्वी विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायात कट्टर उजव्या विचारसरणीच्या लोकांनी घुसखोरी केल्याचा जाहीर आरोप केला होता. तसेच कीर्तन क्षेत्रात काम करणाऱ्या काही विशिष्ट कीर्तनकार आणि महंतांच्या नावांची यादी जाहीर करत त्यांना ‘घुसखोर’ म्हटले होते. या विधानामुळे वारकरी संप्रदायातील एका गटात तीव्र संताप होता, ज्याची परिणती आजच्या शाईफेकीत झाली.









