नवापूर एमआयडीसीतील दोन कापड कंपन्यांना भीषण आग; १५ कोटींचे नुकसान…!

---Advertisement---

 

नवापूर शहरातील औद्योगिक वसाहत असलेल्या एमआयडीसी परिसरात आज दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. एमआयडीसीतील इ ट्वेंटी इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड तसेच रिचेरी प्रायव्हेट लिमिटेड या दोन कापड कंपन्यांमध्ये अचानक आग लागल्याने काही वेळातच संपूर्ण परिसरात धुराचे मोठमोठे लोट पसरले आणि नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले.

आग इतकी प्रचंड होती की काही क्षणांतच कारखान्यांच्या मोठ्या भागाला आगीने वेढले. कापड उद्योग असल्याने कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कापड, धागे, केमिकल्स तसेच इतर ज्वलनशील साहित्य साठवून ठेवण्यात आले होते. त्यामुळे आग वेगाने पसरत गेली आणि आगीच्या ज्वाळा दूरवरूनही दिसत होत्या. काळ्या धुराचे ढग संपूर्ण एमआयडीसी परिसरात पसरल्याने काही काळ परिसर धुरमय झाला होता.

घटनेची माहिती मिळताच नवापूर नगरपालिकेचे अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. मात्र, आगीचे स्वरूप गंभीर असल्याचे लक्षात येताच अतिरिक्त मदतीसाठी सोनगड, व्यारा आणि बारडोली येथूनही अग्निशमन बंब मागविण्यात आले. विविध ठिकाणांहून आलेल्या अग्निशमन दलांच्या मदतीने आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.दरम्यान, आग लागल्याचे वृत्त समजताच घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवून नागरिकांना सुरक्षित अंतरावर हलविण्याचे काम केले. तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार दत्तात्रय जाधव यांनीही घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. महसूल विभाग, पोलिस प्रशासन आणि अग्निशमन विभाग समन्वयाने काम करत असल्याचे दिसून आले.

प्राथमिक माहितीनुसार या आगीत अंदाजे १५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कारखान्यातील यंत्रसामग्री, तयार कापड, कच्चा माल आणि इतर साहित्य मोठ्या प्रमाणावर जळून खाक झाले आहे. नुकसानाचा नेमका आकडा पंचनामा पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.

सुदैवाने, कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र, काही कर्मचाऱ्यांना धुरामुळे किरकोळ त्रास झाल्याचे सांगितले जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून परिसर काही काळासाठी रिकामा करण्यात आला होता.

आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून शॉर्टसर्किट किंवा जात तापमान अन्य तांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आग पूर्णपणे विझल्यानंतर पंचनामा करून पुढील तपास करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.या भीषण आगीमुळे नवापूर एमआयडीसी परिसरात मोठी खळबळ उडाली असून उद्योग क्षेत्रातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून प्रशासनाने औद्योगिक सुरक्षा उपाययोजना अधिक मजबूत करण्याची मागणी केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---