---Advertisement---
नाशिक येथील टीसीएस कंपनीतील कथित धर्मांतर प्रकरण आता राजकीय रंग घेऊ लागले असून, सत्ताधारी पक्ष आणि एमआयएम यांच्यातील आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी या प्रकरणात धर्मांतर, लव्ह जिहाद आणि ड्रग्ज रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता व्यक्त करत खळबळजनक आरोप केले आहेत.
पत्रकार परिषदेत बोलताना शिरसाट यांनी सांगितले की, “हे प्रकरण केवळ निदा खानपुरते मर्यादित नाही. यामागे मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता असून, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.” तसेच या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याची मागणी आपण मुख्यमंत्रीांकडे करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शिरसाट यांनी एमआयएमवरही निशाणा साधत, पक्षाचे काही नेते आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. “निदा खान प्रकरणातील आरोपींना संरक्षण देण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलिसांनी निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी,” असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात कठोर भूमिका घेतल्याचे सांगितले. “कायद्याच्या चौकटीत राहून दोषींवर कारवाई होईल. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, या प्रकरणावर एमआयएमचे प्रमुखअसाद्दुईन ओवायसी भूमिका मांडण्याची शक्यता असून, त्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.









