---Advertisement---
Jalgaon News : शाळेत तसेच क्लासला जाणाऱ्या मुलीशी वैयक्तीक प्रेमसंबंध प्रस्तापित करण्यासाठी पाठलाग केला. रस्त्यामध्ये पीडितेला अडविण्याचा प्रयत्न केला. अल्पवयीन असल्याचे माहिती असुनही आणि पीडितेची इच्छा नाही, असे दिसत असताना तरुणाने तिचा पिच्छा सुरुच ठेवला. हा मानसिक त्रास असह्य झाल्याने १५ वर्षीय पीडितेने पोलिसात कैफियत मांडली. याप्रकरणी या तरुणावर तालुका पोलीस ठाण्यात पीडितेचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पीडितेच्या तक्रारीनुसार २०२५ ते १६ एप्रिल दरम्यान रात्री एक ते दोन वाजेच्या दरम्यान मुलगी शाळेत तसेच क्लासला घरुन येत जात होती. ही संधी हेरत संशयित तरुण या पीडित मुलीचा पाठलाग करत होता. शाळेजवळ तसेच इतर ठिकाणी रस्त्यात अडवून प्रेम संबंधासाठी तिच्यावर दबाव टाकत होता. त्याच्या जाचाला कंटाळुन पीडितेने त्याला प्रेमाचा होकार दिला होता. त्यानंतर संशयित तरुण पीडितेला दुचाकीवर बसवून शहरात फिरविण्यासाठी घेवुन गेला. आणि तिला लज्जा होईल, असे कृत्य केले.
दोघांच्या प्रेमसंबंधाची कुणकुण पीडितेच्या आई वडिलांना लागली. त्यानंतर या दोघांसह इतर नातेवाईकांनी संशयित तरुणासह त्याच्या आई वडिलांना तरुणाचा प्रकार कानावर टाकुन समज दिली. त्यानंतरही संशयित तरुण पीडितेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता. लग्न करण्याची योजना सफल करण्यासाठी पीडितेला पळवून नेण्यासाठी तिच्या घरासमोर ये जा करत होता. गुरुवारी (१६ एप्रिल) रात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास संशयित तरुणाने पीडितेच्या आईला फोन करत शिवीगाळ, दमदाटी केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. पीडितेच्या घराजवळ येत संशयिताने दगडफेक केली. तसेच खिडकीचे नुकसान केले.
या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरुन संशयित तरुणाविरोधात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी घटनास्थळी जावुन माहिती घेतली. पोलीस उपनिरीक्षक श्यामकुमार मोरे हे तपास करीत आहेत.
कॉलेजमध्ये तरुणीचा विनयभंग
शहरातील महाविद्यालयात १८ वर्षीय तरुणी शिक्षण घेत आहे. गुरुवारी (१६ एप्रिल) सकाळी नऊ ते ११ वाजेच्या दरम्यान तरुणी महाविद्यालयात आलेली होती. तिला संशयित तरुणाने महाविद्यालयाच्या सायन्स रुममध्ये बहाना करत बोलवून घेतले. याठिकाणी त्याने पीडितेसमोर किळसवाणी आणि लज्जास्पद कृत्य केले. या विचित्र प्रकाराने पीडिता गर्भगळीत झाली. तिने थेट पोलीस ठाणे गाठत कैफियत मांडली. गुरुवारी याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात संशयित तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस नाईक संतोष सोनवणे हे तपास करीत आहेत.









