---Advertisement---
पुणे : राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भोंदू अशोक खरात प्रकरणी विशेष तपास पथकाकडून (SIT) तब्बल सहा तास चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी चाकणकरांना अनेक महत्त्वाचे प्रश्न विचारल्याची माहिती समोर आली आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर असताना पदाचा गैरवापर केल्याचा ठपका रुपाली चाकणकरांवर ठेवण्यात आला आहे. अशोक खरातसोबतचे संबंध, पूजाविधी, आर्थिक व्यवहार आणि विविध कार्यक्रमांमधील उपस्थिती यासंदर्भात एसआयटीने सखोल चौकशी केली.
चौकशीदरम्यान “अशोक खरातला केव्हापासून ओळखता?”, “खरातसोबत केलेले पूजाविधी नेमके कोणते होते?”, “आर्थिक संबंध होते का?”, तसेच “फोटो आणि व्हिडीओ कोणत्या कार्यक्रमातील होते?” असे अनेक प्रश्न विचारण्यात आले. शिवनिका संस्थेच्या कामकाजाबाबत आणि मंदिरात येणाऱ्या राजकीय नेत्यांबाबतही माहिती मागवण्यात आली.
यावर उत्तर देताना रुपाली चाकणकर यांनी आपण वारकरी संप्रदायातील कुटुंबातून असल्याचे सांगितले. आध्यात्मिक श्रद्धेपोटी आपण अशोक खरात आणि त्यांच्या पत्नीला गुरु मानले होते, मात्र त्यांच्यासोबत कोणतेही आर्थिक संबंध नसल्याचा दावा त्यांनी केला. तसेच खरात यांची दुसरी बाजू आपल्याला माहिती नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले.
चौकशीनंतर माध्यमांशी बोलताना रुपाली चाकणकर म्हणाल्या की, “एसआयटीने विचारलेल्या सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली आहेत. तपासात पोलिसांना जे सहकार्य हवे असेल ते पूर्णपणे करणार आहे. चौकशीचा सविस्तर अहवाल पुढे समोर येईल.”









