---Advertisement---
महाराष्ट्रातील गणेशभक्तांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार नितीन मोरजकर यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण संगीत क्षेत्रासह लाखो गणेशभक्तांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
“पालखी निघाली राजाची” या लालबागच्या राजाचं लोकप्रिय भक्तिगीतामुळे नितीन मोरजकर हे घराघरात पोहोचले होते. विशेष म्हणजे मुंबईतील लालबागचा राजा विसर्जन मिरवणूक आणि विविध गणेशोत्सवांमध्ये त्यांच्या आवाजाने वातावरण भक्तिमय होत असे. त्यांच्या गीतांशिवाय अनेक गणेश मंडळांची मिरवणूक अपूर्ण वाटत असल्याची भावना भक्त व्यक्त करत आहेत.
नितीन मोरजकर यांच्या आवाजातील भक्तीभाव, ऊर्जा आणि भावनिक सादरीकरणामुळे त्यांनी गणेशभक्तांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले होते. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील गणेश मंडळांमध्ये त्यांच्या गीतांना विशेष लोकप्रियता मिळाली होती.
विशेषतः “पालखी निघाली राजाची” हे गीत आजही गणेशभक्तांच्या ओठांवर कायम असून विसर्जन मिरवणुकीत या गीतावर भक्त मोठ्या उत्साहात नाचताना दिसतात. त्यांच्या स्वरांनी गणेशोत्सवाला वेगळी ओळख मिळाल्याचे अनेक भक्त सांगत आहेत.
मात्र नितीन मोरजकर यांच्या निधनाचे नेमके कारण अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झाले नाही.पण त्यांच्या अचानक जाण्याने संगीत विश्वावर शोककळा पसरली असून सोशल मीडियावर चाहत्यांकडून श्रद्धांजली वाहिली जात आहे.
“पालखी निघाली राजाची” हा स्वर आता कायमचा शांत झाला असला तरी नितीन मोरजकर यांची गीते आणि त्यांची भक्तिमय आठवण गणेशभक्तांच्या मनात कायम जिवंत राहणार आहे.









