---Advertisement---
धुळे जिल्ह्यातील खतसाठा वितरणातील अनियमितता, काळाबाजार, लिंकिंग प्रथा व खरीप हंगामातील वैज्ञानिक नियोजनाबाबत धुळे कृषी अधिकारी यांना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मा. शानाभाऊ सोनवणे हे निवेदन देण्यासाठी गेले असता धुळे कृषी अधीक्षक साहेब उपस्थित नसल्याने त्यांचे सहकारी चौधरी साहेब यांना निवेदन देऊन चर्चा केली की धुळे जिल्ह्यातील खत व्यवस्थेतील अनागोंदी थांबवा, शेतकऱ्यांना न्याय द्या अशी मागणी निवेदन देऊन केली.
धुळे जिल्ह्यात खरीप हंगाम तोंडावर असताना खत उपलब्धतेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. शेती हीच मुख्य उपजीविका असलेल्यामुळे जिल्ह्यात खताचा पुरवठा, साठा व्यवस्थापन आणि वितरण प्रणाली यामध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता व अपारदर्शकता निर्माण झाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत ठोस व तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे.
जिल्ह्यातील विविध भागांतून येणाऱ्या तक्रारी चिंताजनक आहेत. खत उपलब्ध असूनही कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याच्या घटना समोर येत आहेत. काही ठिकाणी शेतकऱ्यांना खतासाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे, तर काही विक्रेते जादा दर आकारून सर्रास लूट करत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. याहूनही गंभीर बाब म्हणजे, खत खरेदी करताना शेतकऱ्यांना बियाणे, कीटकनाशके किंवा इतर कृषी साहित्य जबरदस्तीने घ्यावे लागत असल्याची ‘लिंकिंग’ प्रथा अजूनही सुरू आहे. ही बाब केवळ बेकायदेशीरच नाही, तर शेतकऱ्यांच्या स्वाभिमानावर आघात करणारी आहे.
सर्वात मोठी समस्या म्हणजे पारदर्शकतेचा अभाव. जिल्ह्यात नेमका किती खतसाठा उपलब्ध आहे, तो कोणत्या दुकानात आहे, वितरण कसे होत आहे. याबाबत कोणतीही स्पष्ट व अधिकृत माहिती शेतकऱ्यांना मिळत नाही. परिणामी अफवा, गोंधळ आणि असंतोष वाढत असून काही ठिकाणी कृत्रिम तुटवडा निर्माण करून काळाबाजाराला खतपाणी घातले जात आहे.
या गंभीर परिस्थितीवर भाष्य करताना शानाभाऊ सोनवणे यांनी प्रशासनाला थेट सवाल केला आहे की, “शेतकऱ्यांना अडचणीत टाकून कोणाच्या हितसंबंधांचे रक्षण केले जात आहे?” त्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, खत वितरणातील गोंधळ आणि शेतकऱ्यांची लूट थांबवली नाही, तर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे वतीने तीव्र जनआंदोलन उभे करण्यात येईल.
सोनवणे यांनी काही ठोस आणि परिणामकारक उपाययोजना सुचवल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व खत साठ्याची दररोज अद्ययावत माहिती सार्वजनिक करणे, प्रत्येक गावातील कृषी सेवा केंद्रानुसार उपलब्ध साठा PDF स्वरूपात व्हॉट्सअॅपवर उपलब्ध करून देणे, काळाबाजार व जादा दर आकारणाऱ्यांवर विशेष पथकाद्वारे कठोर कारवाई करणे आणि ‘लिंकिंग’ प्रथा पूर्णपणे बंद करणे. या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. तसेच खरीप हंगामासाठी पिकनिहाय व क्षेत्रनिहाय वैज्ञानिक नियोजन करून वेळेवर खत पुरवठा सुनिश्चित करण्यावरही त्यांनी भर दिला आहे.
शेतकऱ्यांसाठी सुलभ तक्रार निवारण यंत्रणा उभारण्याची आणि प्रत्येक तक्रारीवर निश्चित कालमर्यादेत कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून निष्काळजीपणा अथवा संगनमत आढळल्यास कठोर प्रशासकीय कारवाई करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
आजची परिस्थिती केवळ खत पुरवठ्याचा प्रश्न नाही, तर ती ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या स्थैर्याशी आणि शेतकऱ्यांच्या अस्तित्वाशी निगडित आहे. योग्य वेळी योग्य खत मिळाले नाही, तर पिकांचे नुकसान होईल आणि त्याचा थेट परिणाम उत्पादनावर व शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होणार आहे. त्यामुळे हा प्रश्न तातडीने सोडवणे अत्यावश्यक आहे.
शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष उभारण्यास भाग पाडले गेले, तर त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील. आणि जर आपल्या कडून कुठलीही कार्यवाही झाली नाही व शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाहीतर आम्ही उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने एक टिम तयार करून साठवून ठेवलेला खत पुरवठा व खत विक्री करणाऱ्या शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ तेव्हा आपल्या ला देखील वेठीस धरले जाईल याची दखल घ्यावी अशा शब्दांत शानाभाऊ सोनवणे यांनी सांगितले तसेच
धुळे जिल्ह्यातील खत व्यवस्थेतील ही अनागोंदी थांबवून पारदर्शक, शिस्तबद्ध आणि शेतकरीहिताचे धोरण राबविणे ही काळाची गरज आहे. आणि त्यासाठी तातडीची, ठोस व परिणामकारक कारवाई होणे अत्यावश्यक आहे. असे देखील सोनवणे यांनी सांगितले.









