---Advertisement---
तळोदा शहरात घरगुती गॅस सिलेंडरचा सर्रास व्यावसायिक वापर सुरू असल्याच्या तक्रारी अखेर प्रशासनाने गंभीरपणे घेतल्या आणि शनिवारी जिल्हा पुरवठा विभागाने थेट धडक कारवाई करत अनेक हॉटेल व्यावसायिकांना दणका दिला. या कारवाईत तब्बल १४ घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आल्याने शहरातील हॉटेल व्यवसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पुरवठा विभागसह तळोदा पुरवठा विभागाच्या पथकाने तळोदा शहरातील विविध हॉटेल्स, खानावळी आणि खाद्य व्यवसायिकांच्या ठिकाणी अचानक तपासणी मोहीम राबवली. तपासणीदरम्यान अनेक ठिकाणी व्यावसायिक वापरासाठी आवश्यक असलेल्या कमर्शियल सिलेंडरऐवजी स्वस्त दरातील घरगुती सिलेंडरचा वापर सुरू असल्याचे उघड झाले.
नियमांचे सर्रास उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात पथकाने तात्काळ कारवाई करत १४ सिलेंडर जप्त केले. अचानक पडलेल्या या धाडीमुळे काही हॉटेल चालकांची अक्षरशः तारांबळ उडाल्याचे चित्र शहरात पाहायला मिळाले.
पुरवठा विभागाने संबंधित व्यावसायिकांविरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली असून, “घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर अजिबात खपवून घेतला जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे. पुढील काळातही अशाच धडक मोहिमा सुरू राहणार असल्याने नियम तोडणाऱ्या व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत.









