---Advertisement---
महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या खासगी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. 9 जून रोजी मुंबईहून दिल्ली दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी हा बिघाड निदर्शनास आला. त्यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रवासाला सुमारे 45 मिनिटांचा विलंब झाला.
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा नियोजित होता. त्या संध्याकाळी 5 वाजता खासगी विमानाने दिल्लीला रवाना होणार होत्या. मात्र उड्डाणापूर्वीच वैमानिकाला विमानात काही तांत्रिक अडचण आढळली. त्यानंतर आवश्यक तपासणी आणि दुरुस्ती करण्यात आली.
या घटनेनंतर सुनेत्रा पवार यांनी पर्यायी विमानाची व्यवस्था करून दिल्लीचा प्रवास पूर्ण केला. दिल्लीतील बैठकीनंतर त्यांचा परतीचाही प्रवास सुरक्षितपणे पार पडल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रवासात सुनेत्रा पवार यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार, खासदार सुनील तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल हे देखील उपस्थित होते. ही सर्वमंडळी एका महत्त्वाच्या राजकीय बैठकीसाठी दिल्ली दौऱ्यावर होती.
या घटनेचा कोणताही संबंध व्हीएसआर कंपनीच्या विमानाशी नसल्याचे सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यांनी व्हीएसआर कंपनीच्या विमानाचा वापर कोणत्याही टप्प्यावर केलेला नसल्याचेही सांगण्यात आले. तसेच संपूर्ण प्रवास सुरक्षित झाल्याची माहिती देण्यात आली आहे.









