---Advertisement---
जळगाव शहरातील शनिपेठ आणि आसोदा रोड परिसरात एका रात्रीत दोन दुकानांवर चोरीचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. लाल रंगाच्या कारमधून आलेल्या चोरट्यांच्या टोळीने ही चोरी केल्याची माहिती समोर आली आहे.
भिलपुरा पोलिस चौकीपासून अगदी काही अंतरावर असलेल्या पद्मालया मेडिकलवर प्रथम हात साफ करण्यात आला. गस्तीवर असलेले पोलिस पथक पुढे गेल्यानंतरच चोरट्यांनी संधी साधल्याचे सांगितले जाते. त्यांनी शटरचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला आणि गल्ल्यातील अंदाजे ५ ते ८ हजार रुपये तसेच काही साहित्य चोरून नेले. पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने त्यांनी सीसीटीव्हीचा डीव्हीआरही सोबत नेला.
यानंतर चोरट्यांनी आसोदा रोडवरील एका हार्डवेअर दुकानाला लक्ष्य केले. येथेही शटर उचकटून सुमारे ५ हजारांची रोकड लंपास करण्यात आली. या दुसऱ्या चोरीची संपूर्ण घटना मात्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
चोरीनंतर पोलिसांनी तत्काळ पाठलाग केला, मात्र आरोपी पसार होण्यात यशस्वी झाले. सध्या पोलिसांकडून तपास सुरू असून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.









