राज्यात सर्व ११ जागांवर महायुतीचाच विजय निश्चित; विरोधकांना खातेही उघडता येणार नाही- गुलाबराव पाटलांचा दावा…!

---Advertisement---

 

राज्यात आज विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यातील विधान परिषद निवडणुकीतील सर्व ११ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील आणि विरोधकांना खातेही उघडता येणार नाही, असा विश्वास राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.

जळगावात प्रसारमाध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले की, “आता फक्त औपचारिकता बाकी असून राज्यातील अकराच्या अकरा जागा महायुती जिंकणार आहे. विरोधकांना खातेही उघडता येणार नाही. सर्व बंडखोरी शमली असून निकाल आमच्या बाजूने लागेल.”

जागावाटपाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “मी नाराज नाही. आमची मागणी संबंधित जागा आम्हाला मिळावी अशी होती. मात्र, अंतिम निर्णय नेतृत्वाचा असतो आणि नेतृत्वाने दिलेल्या आदेशानुसार आम्ही काम करत असतो.”

जळगाव मतदारसंघाबाबतही त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. “जळगावचा निकाल दणदणीत लागेल. ६३० पैकी सुमारे ५८० मते आमच्या उमेदवाराला मिळतील,” असा दावा त्यांनी केला.

राज्यातील राजकीय परिस्थिती महायुतीच्या बाजूने असल्याचे सांगत राज्यात महायुतीलाच स्पष्ट बहुमत मिळेल, असा विश्वासही गुलाबराव पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---