---Advertisement---
पारोळा तालुक्यातील धुळपिंप्री येथे रुग्णांची तपासणी करण्यासाठी आलेल्या एका डॉक्टरवर गैरसमजातून जमावाने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत डॉक्टर जखमी झाले असून त्यांच्या दुचाकी वाहनाचीही तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी ७ ते ८ अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारोळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगरूळ येथील रहिवासी डॉ. भास्कर रामराव पाटील (वय ४६) हे परिसरातील विविध गावांमध्ये रुग्णांची तपासणी करतात. १५ जून २०२६ रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास ते धुळपिंप्री येथे आले होते. गावात काही लहान मुले खेळत असताना, डॉ. पाटील यांनी एका ६ ते ७ वर्षांच्या लहान मुलीला आपुलकीने गालाला पकडून खेळवले. मात्र, हा प्रकार तिथे असलेल्या एका महिलेने पाहिल्याने तिचा गैरसमज झाला. तिने डॉक्टर नेमके काय करत आहेत, अशी विचारणा करत आरडाओरडा करून परिसरातील लोकांना गोळा केले.
डॉक्टरांनी परिस्थिती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु काहीही ऐकून न घेता जमावाने त्यांना घेराव घातला. संतप्त झालेल्या ७ ते ८ अज्ञात लोकांनी डॉ. पाटील यांना चापट मारून, लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी दांडक्याने अमानुषपणे मारहाण केली. तसेच त्यांच्या ताब्यातील वाहनाचीही तोडफोड केली. घटनेची माहिती मिळताच पारोळा पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी मध्यस्थी करत डॉक्टरांना सुरक्षित ठिकाणी हलवले. त्यानंतर डॉक्टरांना कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
डॉ. भास्कर रामराव पाटील यांच्या तक्रारीवरून ७ ते ८ अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान, या प्रकरणातील सर्व बाबींची सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.









