---Advertisement---
महाराष्ट्र शासनाने पुणे आणि बीड जिल्ह्यांच्या पालकमंत्री नियुक्तीबाबत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने यासंदर्भातील शासन निर्णय (GR) प्रसिद्ध करण्यात आला आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे पुणे आणि बीड जिल्ह्यांचे पालकमंत्री पद रिक्त झाले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने नवीन नियुक्ती केली आहे. शासन निर्णयानुसार, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांची पुणे आणि बीड जिल्ह्यांच्या नवीन पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हा निर्णय तात्काळ अमलात येणार असून, संबंधित शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. निर्णय डिजिटल स्वाक्षरीसह प्रमाणित करण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी होती मात्र 28 जानेवारी रोजी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं त्यानंतर पुणे जिल्ह्याचे व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे रिक्त झालं होतं. यासह उपमुख्यमंत्री पद हे देखील रिक्त झालं होतं मात्र अजित पवार यांच्या उत्तराधिकारी म्हणून सुनेत्रा पवार समोर आल्या आणि सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
अजित पवार यांच्या निधनानंतर चौथ्या दिवशी राजभवन येथे सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. अनेकांनी या शपथविधी सोहळ्याचं समर्थन केलं तर अनेकांनी त्यांच्यावर टीकाही केली. मात्र पुणे व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे कोणाच्या वाटेला जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून होतं दरम्यान आता सुनेत्रा पवार यांच्याकडे पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे याबाबत सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रकही जारी केला आहे.या नियुक्तीमुळे पुणे आणि बीड जिल्ह्यांच्या प्रशासकीय कामकाजाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.









