---Advertisement---
एरंडोल–पारोळा–भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल चिमणराव पाटील यांचा वाढदिवस यंदा राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. याला कारण ठरले आहे ते राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी पाठवलेले अत्यंत आत्मीयतेचे आणि अर्थपूर्ण शुभेच्छा पत्र.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पत्रात आमदार अमोल पाटील यांचा उल्लेख “आश्वासक साथ देणारे नेतृत्व” असा करत त्यांच्या कार्यशैलीचे, बुद्धिमत्तेचे आणि समाजकार्याचे मनापासून कौतुक केले आहे. राज्याच्या राजकारणात ‘कार्यसम्राट’ म्हणून ओळख असलेल्या शिंदेंकडून मिळालेल्या या शब्दांमुळे राजकीय वर्तुळात अमोल पाटील यांचे वजन अधिक वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे.
“तुमची साथ माझ्यासाठी नेहमीच आश्वासक आहे,” या एका ओळीतून उपमुख्यमंत्री आणि आमदारांमधील विश्वासाचे व घनिष्ठतेचे नाते स्पष्टपणे अधोरेखित झाले आहे. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर राष्ट्रहितासाठी भरीव योगदान द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करत शिंदेंनी आमदार पाटील यांच्या भविष्यातील मोठ्या राजकीय प्रवासाचे सूचक संकेत दिले आहेत. यासोबतच त्यांनी दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्याच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

मतदारसंघात उत्साहाचे वातावरण असून मंत्रालयातून थेट मिळालेल्या या विशेष शुभेच्छांमुळे एरंडोल–पारोळा–भडगाव मतदारसंघात कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. “ज्यांच्या पाठीशी थेट सत्तेचे केंद्र उभे आहे, असा आमचा आमदार,” अशा भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहेत.
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठवलेले हे शुभेच्छा पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, आमदार अमोल पाटील यांच्यावर सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.









