कारण नसताना किरकोळ वाद; आणि भयानक शेवट ! नेमकं काय घडलं ?

---Advertisement---

 

जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात कारण नसताना घडलेल्या एका किरकोळ वादाचा शेवट अक्षरशः अंगावर काटा आणणारा आणि धक्कादायक ठरला आहे. जळगाव शहरातील प्रशांत पाटील चौकात झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या २१ वर्षीय शुभम गजानन सपकाळे याचा मुंबईतील जे.जे. रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण पिंप्राळा परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे.

वादात नेमकं काय घडलं ?

१ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास शुभम सपकाळे हा रस्त्यावरून जात असताना काही संशयितांनी त्याला अडवले. कोणतेही कारण नसताना विशाल भिका सोनवणे, चंद्रकांत उर्फ बाळा कोळी, यश प्रदीप पाटील (बाँड) आणि धीरज कोळी यांनी संगनमत करून त्याच्यावर लाथाबुक्क्यांनी तसेच लाकडी दांडक्याने अमानुष मारहाण केली. या हल्ल्यात शुभमच्या डोक्याला व पाठीला गंभीर दुखापत झाली होती. प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला तातडीने मुंबईतील जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली.

या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात यापूर्वी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता शुभमचा मृत्यू झाल्याने या गुन्ह्यात कलम १०३ (खून) वाढवण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू आहे.

शुभमच्या मृत्यूची बातमी परिसरात पसरताच पिंप्राळ्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली पिंप्राळा परिसरात तसेच शुभमच्या घराजवळ मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शुभमचा मृतदेह आज शुक्रवारी जळगावात आणला जाण्याची शक्यता असून त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या प्रकरणात आतापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित दोन आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.

या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश माळी करत असून, पुढील कारवाई वेगाने सुरू आहे. किरकोळ वादातून झालेल्या या क्रूर हत्येने संपूर्ण शहर हादरून गेले आहे

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---