---Advertisement---
मुंबईतील मालाडमधून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मालाडमधील एका नामांकित शाळेत अवघ्या पाच वर्षांच्या चिमुकलीवर शाळेतील शिपायाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली असून यामुळे पालकवर्गात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना १२ जानेवारी रोजी शाळेच्या परिसरात घडली होती. शाळेतील शिपायाने धमकावून, भीती दाखवत पाच वर्षीय मुलीवर अत्याचार केला. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकारानंतर मुलीने भीतीपोटी बराच काळ कोणालाही काहीच सांगितले नाही.
काही दिवसांनंतर मुलीच्या वागण्यात बदल जाणवू लागल्याने पालकांना संशय आला. त्यांनी मुलीकडे विचारपूस केली असता तिने रडत संपूर्ण प्रकार सांगितला. मुलीच्या जबाबानंतर पालकांनी ६ फेब्रुवारी रोजी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रार केल्यानंतर पालकांनी शाळा प्रशासनाकडे जाब विचारला असता, त्यांना उलट धमकावण्यात आल्याचा गंभीर आरोपही पालकांनी केला आहे. या प्रकारामुळे शाळा व्यवस्थापनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शाळेचा शिपाई अनिल पांचाळ (वय ३०) आणि शाळेचा सीईओ अनंत यज्ञीक (वय ६५) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ७४, ३५१ (२) तसेच पोक्सो कायद्याच्या कलम १०, १७ आणि २१ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दोघांनाही अटक करण्यात आली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
शाळेसारख्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ठिकाणी अशा प्रकारची घटना घडल्याने मालाड परिसरातील पालक आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून शाळा प्रशासनाच्या जबाबदारीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.









