---Advertisement---
भुसावळ तालुक्यातील सिद्धेश्वर नगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत येते, तिची स्थिती गंभीर आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना वर्गात जाण्यासाठी पायऱ्या नसल्यामुळे रोजचं धोकादायक कसरत करावी लागते, तर शाळेतील मुतारी, शौचालय, वर्गाजवळील वरांडा आणि कंपाऊंड ही अत्यंत खराब स्थितीत आहेत. पावसाळ्यात इमारतीच्या भिंतींवर गळती होते, त्यामुळे वर्गातील परिस्थिती आणखी बिकट होते. यामुळे विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य, तसेच शिक्षणावरही नकारात्मक परिणाम होत आहे.
इतकेच नव्हे तर शाळेतील मुतारी, शौचालये, वर्गाजवळील वरांडा आणि कंपाऊंड भिंत पूर्णतः खराब अवस्थेत आहेत. पावसाळ्यात इमारतीच्या भिंतींना मोठ्या प्रमाणात गळती लागते, त्यामुळे वर्गात बसणे विद्यार्थ्यांसाठी कठीण होत आहे. ओलावा, अस्वच्छता आणि असुरक्षित वातावरण यामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यावरही परिणाम होत असल्याचे चित्र आहे.
पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितले की, “शाळेच्या इमारतीची अवस्था पाहता मुलांना इथे शिक्षण घेणे सुरक्षित राहिलेले नाही. पायऱ्या नसल्याने लहान मुलांना अपघाताचा धोका आहे, तर खराब शौचालयांमुळे स्वच्छतेचा प्रश्न गंभीर झाला आहे. प्रशासनाने तातडीने या शाळेकडे लक्ष द्यावे.”
“ही शाळा पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देते. मात्र विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष झाले आहे. शाळा आदर्श बनवायची असेल, तर इमारत व सुविधा तातडीने दुरुस्त करणे अत्यावश्यक आहे.” शाळेतील शिक्षकांनीही अशी चिंता व्यक्त केली आहे.
“शाळेची ही दुर्दशा केवळ विद्यार्थ्यांपुरती मर्यादित नाही, तर संपूर्ण समाजाच्या शैक्षणिक दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. वेळीच उपाययोजना न झाल्यास भविष्यातील पिढ्यांना सुरक्षित व दर्जेदार शिक्षण मिळणे कठीण होईल.” मात्र शाळा प्रशासनाकडून याबाबत जळगाव जिल्हा परिषद व शिक्षण विभागाकडे वारंवार तक्रारी पाठवण्यात आल्या आहेत. अद्याप कोणतीही ठोस कारवाई किंवा दुरुस्ती न झाल्याने पालक, शिक्षक आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून शाळेच्या इमारतीची दुरुस्ती व मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.









