---Advertisement---
नवी दिल्ली : स्वातंत्र्यानंतर साउथ ब्लॉक आणि नॉर्थ ब्लॉक सारख्या इमारती देशासाठी अनेक निर्णय आणि धोरणे ठरवण्यात महत्वाची भूमिका बजावत होत्या. मात्र, त्या इमारती ब्रिटिश साम्राज्याचे प्रतीक म्हणून बांधलेल्या होत्या. या इमारती बांधण्याचा उद्देश भारताला गुलामगिरीच्या बेड्यांमध्ये बांधणे हा होता, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. सेवा तीर्थ आणि भवनच्या उद्घाटन कर्तव्य सोहळ्यात ते बोलत होते.
आज आपण एक नवीन इतिहास घडताना पाहत आहोत. आज विक्रम सवंत २०८२, फाल्गुन कृष्ण पक्ष, विजया एकादशीचा महत्वाचा शुभदिवस आहे. १३ फेब्रुवारी हा दिवस भारताच्या विकास प्रवासात एक नवीन सुरुवात आहे. विजया एकादशीला आपल्या धर्मग्रंथांमध्ये खूप महत्व आहे. या दिवशी आपण ज्या संकल्पाने पुढे जातो तो निश्चितच विजयाकडे नेतो. आज आपण सर्वजण विकसित भारताच्या ध्येयाने सेवा तीर्थात प्रवेश करत आहोत, असेही ते म्हणले. २०१४ मध्ये देशाने ठरवले की, आता गुलामगिरीची मानसिकता चालणार नाही. ही मानसिकता बदलण्यासाठी आम्ही एक मोहीम सुरू केली आहे. आम्ही शूरांच्या नावाने राष्ट्रीय युद्ध स्मारक उभारले. पोलिसांच्या शौर्याचा सन्मान करण्यासाठी पोलिस स्मारक बांधले. रेसकोर्स रोडचे नाव लोककल्याण मार्ग, असे ठेवण्यात आले. हे केवळ नाव बदलणे नव्हते. सत्तेच्या वृत्तीचे सेवाभावात रूपांतर करण्याचा एक पवित्र प्रयत्न होता, असेही पंतप्रधान म्हणाले.
जुन्या इमारती होणार संग्रहालये
पंतप्रधान पुढे म्हणाले, या घडामोडीदरम्यान जुन्या इमारतीत घालवलेल्या अनेक वर्षांच्या आठवणी निश्चितच आपल्यासोबत असतील. वेगवेगळ्या वेळी तिथे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आणि तेथूनच देशाला नवीन दिशा मिळाली. ते संकुल, ती इमारत भारताच्या इतिहासाचा एक भाग आहे. त्यामुळे आम्ही ते राष्ट्राला समर्पित संग्रहालयात रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले.
१४० कोटी देशवासीयांची स्वप्ने साकार करू
पंतप्रधान पुढे म्हणाले, साउथ ब्लॉक आणि नॉर्थ ब्लॉक सारख्या इमारती ब्रिटीश सरकारच्या स्वप्नांची अंमलबजावणी करण्यासाठी बांधल्या होत्या. परंतु, आज मी अभिमानाने म्हणू शकतो की, सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवनसारख्या नवीन संकुलांची उभारणी भारतीयांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी करण्यात आली आहे येथे घेतलेले निर्णय कोणत्याही महाराजांच्या स्वप्नावर आधारित नसून १४० कोटी देशवासीयांच्या स्वप्नावर आधारित असतील.









