जळगावात हर्षवर्धन सपकाळांविरोधात भाजप आक्रमक; प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत व्यक्त केला निषेध….!

---Advertisement---

 

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात भारतीय जनता पार्टी जळगाव महानगरच्या वतीने आज जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान यांच्याशी करणे हे महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि तमाम शिवप्रेमींचा अपमान असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला.

भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, धर्मनिष्ठ आणि लोककल्याणकारी राजा होते. रयतेसाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचले. अशा युगपुरुषाची तुलना धार्मिक कट्टरतावादी टिपू सुलतान यांच्याशी करणे हे निंदनीय, निषेधार्ह आणि इतिहासाचे विकृतीकरण करणारे असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले.

प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून भाजपकडून संताप व्यक्त:

या निषेधाच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी चार वाजता जुने वसंत स्मृती कार्यालय येथून हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिकृतीची तिरडी काढून प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. तिरडीवर पुतळा ठेवून आंदोलन करण्यात आले. या तिरडीला महेश चौधरी यांनी अग्नी दिला. अंत्ययात्रेदरम्यान आमदार सुरेश भोळे (राजू मामा), जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, महापौर दिपमाला काळे, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तिरडीला खांदा दिला.

अंत्ययात्रा टॉवर चौकात पोहोचल्यानंतर महिला कार्यकर्त्यांनी भावनिक पद्धतीने काँग्रेस पक्षाचा निषेध नोंदवला. यावेळी “छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही”, “सपकाळ यांनी तात्काळ माफी मागावी” अशा घोषणा देण्यात आल्या.

भाजप जळगाव महानगरने हर्षवर्धन सपकाळ यांनी तात्काळ महाराष्ट्रातील जनतेची जाहीर माफी मागावी, अन्यथा कायदेशीर आणि राजकीय पातळीवर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला. इतिहासाचा अपमान करणाऱ्या व्यक्तींवर तात्काळ कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
या आंदोलनात भाजपचे नगरसेवक, जिल्हा पदाधिकारी, युवा मोर्चा, महिला आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---