---Advertisement---
भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरातील रिलायन्स जिओ कंपनीच्या टॉवरच्या मशिनरी बॉक्समधील बाहेरील वायर अज्ञात व्यक्तीकडून दररोज रात्री कापली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे गेल्या पाच दिवसांपासून वरणगाव शहर व परिसरातील जिओ नेटवर्क पूर्णपणे ठप्प झाले असून सुमारे १५ हजार ग्राहकांवर त्याचा परिणाम झाला आहे.
वरणगाव शहरातील तलाठी कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या जिओ टॉवर परिसरात हा प्रकार घडत असल्याची माहिती समोर आली आहे. वायर कापल्यामुळे टॉवरची सेवा खंडित होत असून मोबाईलला रेंज मिळत नाही. परिणामी अनेक ग्राहकांचा परस्परांशी संपर्क तुटला आहे. तसेच फोनपे व गुगल पे सारख्या डिजिटल व्यवहार सेवा बंद पडल्याने आर्थिक व्यवहारांनाही फटका बसला आहे.

अनेक ग्राहकांनी सवलतीच्या दरातील तीन किंवा सहा महिन्यांचे रिचार्ज केले असून केबल टीव्ही ग्राहकांनीही आगाऊ रक्कम भरली आहे. मात्र नेटवर्क बंद असल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही ग्राहकांनी जिओ ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता समाधानकारक उत्तर मिळत नसल्याची तक्रार आहे.
दरम्यान, कंपनीतील काही कर्मचाऱ्यांना पूर्वसूचना न देता कमी करण्यात आल्याची चर्चा असून, त्यातूनच संतापाच्या भावनेतून केबलचे नुकसान केले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तथापि, याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही.
या प्रकाराबाबत संबंधित पदाधिकाऱ्यांनी वरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे. दरम्यान, नेटवर्क सेवा तातडीने सुरळीत करावी, अशी मागणी जिओ ग्राहकांकडून होत आहे.









