---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि आश्चर्यचकित करणारी घटना समोर आली असून चोपडा ग्रामीण पोलिस ठाणे येथील दोन पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची माहिती आहे. ही घटना हातेड–अन्वर्दे शिवार परिसरात घडली असून या मारहाणीत दोघेही पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.
जखमी पोलीस कर्मचाऱ्यांची नावे शशिकांत पारधी आणि राकेश पाटील अशी असून, हाणामारीत राकेश पाटील यांच्या डाव्या हाताला तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर धुळे येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर शशिकांत पारधी यांच्या डोक्याला जबर मार लागला असून, त्यांच्यावर चोपडा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, घटनेपूर्वी दोघांची हातेड–अन्वर्दे शिवार परिसरात अचानक भेट झाली. यावेळी आधीपासून सुरू असलेल्या वादाचे रूपांतर जोरदार हाणामारीत झाले. ड्युटी वाटप, हजेरी नोंद आणि अंतर्गत कामकाजाच्या कारणावरून दोघांमध्ये काही दिवसांपासून वैमनस्य होते. त्याच वैमनस्यातून काल रात्री ही धक्कादायक हाणामारी झाल्याचे बोलले जात आहे.
या घटनेमुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून घटनेची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. पुढील कारवाई आणि चौकशी अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









