खळबळजनक: दुचाकी जाळणारे संशयित मंदिराच्या CCTV मध्ये कैद, दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा…

---Advertisement---

 

जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात १३ फेब्रुवारीच्या मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत १७ हून अधिक दुचाकी जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रामेश्वर कॉलनी येथील साई गजानन रेसिडेन्सीच्या पार्किंगमध्ये घडली.

रात्री सुमारे २ वाजेच्या सुमारास पार्किंगमध्ये अचानक आग लागली. समोरच्या विंगमधील एका महिलेला आग दिसताच तिने आरडाओरडा केला. त्यानंतर रहिवाशांनी तात्काळ खाली धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत १७ हून अधिक दुचाकी जळून पूर्णतः खाक झाल्या होत्या.

दरम्यान, या घटनेला नवीन वळण मिळाले आहे. अपार्टमेंट शेजारील साई गजानन मंदिर येथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये घटनेच्या काही मिनिटे आधी चेहरे झाकून दुचाकीवरून जात असलेले दोन संशयित कैद झाल्याचा नागरिकांचा दावा आहे. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला आहे.

या प्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलीस ठाणे येथे दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आग लागण्यामागे अपघात की जाणीवपूर्वक घातपात, याबाबत पोलिसांकडून सर्व अंगांनी चौकशी केली जात आहे.

घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने कडक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---