---Advertisement---
नगरदेवळा येथे सुरू असलेल्या गावठी दारूच्या अवैध व्यवसायावर पोलिसांनी मोठी कारवाई करत हातभट्ट्यांवर छापा टाकला. या कारवाईत कच्चे-पक्के रसायन, तयार दारू आणि साहित्य असा सुमारे १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच लाखो लिटर रसायन जागेवरच नष्ट करण्यात आले असून सहा भट्ट्या जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत.
ही कारवाई पाचोरा तालुक्यातील धरण परिसरात पार पडली. गेल्या काही वर्षांपासून गावठी दारूमुळे अनेक तरुणांचा बळी गेल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या. १३ फेब्रुवारी रोजी एका तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर गावात संतापाची लाट उसळली होती. कुटुंबीयांनी मृत्यूमागे गावठी दारू कारणीभूत असल्याचा आरोप केला होता.
माजी उपसरपंच विलास भामरे यांनी पोलिस प्रशासनाला कठोर कारवाईची मागणी करत अन्यथा जनआंदोलन उभारण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम तीव्र करत आज (दि.१५) पहाटे छापा टाकला.
पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार निवृत्ती मोरे, हेड कॉन्स्टेबल हरीश अहिरे, दिनेश पाटील, वैभव पाटील आणि मजीद पठाण यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई केली. एका आरोपीस अटक करण्यात आली असून त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, गावठी दारूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांकडून पुढील काही दिवसांत विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.









