---Advertisement---
जळगाव जिल्ह्यात युरियासह इतर रासायनिक खतांचा कोणताही प्रत्यक्ष तुटवडा नसतानाही काही विक्रेत्यांकडून कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट केली जात असल्याचे उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे मोठी कारवाई करत तब्बल ३४१८ गोण्यांचा युरिया साठा जप्त केला आहे. या कारवाईने खत विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
कासोदा व परिसरातील शेतकऱ्यांनी युरियाचा तुटवडा भासवून जादा दराने विक्री होत असल्याची तक्रार कृषी विभागाकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत गुणवत्ता नियंत्रण पथकासह कृषी अधिकाऱ्यांनी १८ तारखेला अचानक तपासणी मोहीम राबवली. तपासणीदरम्यान काही दुकानांत मोठ्या प्रमाणावर युरियाचा साठा लपवून ठेवण्यात आल्याचे आढळून आले. प्राथमिक पंचनामा करून संबंधितांविरुद्ध कारवाईचा प्रस्ताव तयार करण्यात येत असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.
या कारवाईदरम्यान खालील कृषी केंद्रांची तपासणी करण्यात आली:
- प्रवीण हार्डवेअर व कृषी केंद्र
- आबासाहेब खंडेराव फ्रुटसेल सोसायटी
- साई कृषी केंद्र
- सुदर्शन कृषी केंद्र
- गणेश पुंडलिक वाणी कृषी केंद्र
- जाजू केंद्र
तपासणीदरम्यान खत विक्रीची ऑनलाईन नोंद आणि प्रत्यक्ष विक्री यामध्ये मोठी तफावत आढळून आली.
कारवाईदरम्यान एका शेतकऱ्याने आधारकार्ड सादर करून दोन गोण्या युरिया खरेदी केल्या. मात्र ‘पॉस’ प्रणालीतील ऑनलाईन नोंदी तपासल्यावर त्या शेतकऱ्याच्या नावावर १८ गोण्यांची नोंद झाल्याचे आढळले. म्हणजेच प्रत्यक्षात दोन गोण्या दिल्यानंतर उर्वरित १६ गोण्यांची नोंद त्याच आधार क्रमांकावर करण्यात आली होती.

या प्रकारामुळे संबंधित विक्रेत्याने शेतकऱ्याच्या नकळत अतिरिक्त १६ गोण्या दाखवून त्यांचा संभाव्य काळाबाजार करण्याचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी संबंधित शेतकऱ्याचा जबाब नोंदविण्यात आला आहे.
कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा कृषी विभागाने दिला आहे. सध्या जप्त केलेल्या साठ्याबाबत पुढील चौकशी सुरू असून दोषींवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे.
---Advertisement---
या कारवाईनंतर शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाकडून खतांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू असल्याची माहितीही देण्यात आली आहे.









