---Advertisement---
जळगाव : सोने आणि चांदीच्या दरातील चढ-उताराचा सिलसिला कायम असून आज शुक्रवारी सकाळी बाजार उघडताच दोन्ही मौल्यवान धातूंनी पुन्हा उसळी घेतली. कालच दरात घसरण झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला होता; मात्र आजच्या वाढीमुळे खरेदीदार आणि सराफ व्यावसायिकांमध्ये पुन्हा संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा ३०९ रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. जीएसटीसह सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,६३,७७० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. यापूर्वी गुरुवारी दिवसभरात १,१३३ रुपयांची घसरण होऊन दर १,६३,४६१ रुपयांवर आले होते. त्यामुळे एका दिवसातच भावात पुन्हा वाढ झाल्याचे चित्र आहे.
दुसरीकडे चांदीच्या दरातही मोठी उसळी पाहायला मिळाली. आज सकाळी बाजार उघडताच चांदी दरात तब्बल ८,२४० रुपयांची वाढ झाली. जीएसटीसह प्रति किलो चांदीचा दर २,८१,१९० रुपयांवर पोहोचला. विशेष म्हणजे कालच चांदीच्या दरात तेवढीच म्हणजे ८,२४० रुपयांची घसरण होऊन दर २,७२,९५० रुपयांवर आले होते. त्यामुळे गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांमध्ये सतत बदलणाऱ्या दरांमुळे सावध भूमिका घेतली जात आहे.
दरवाढीमागे जागतिक घडामोडी महत्त्वाच्या ठरत आहेत. अमेरिका–इराण तणाव तसेच पाकिस्तान- अफगाण संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर अस्थिरता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोने आणि चांदीकडे वळतात. परिणामी मागणीत वाढ होऊन दरात उसळी येताना दिसत आहे.
आगामी काळात जागतिक परिस्थिती आणि डॉलरच्या चढ-उतारावर स्थानिक बाजारातील दर अवलंबून राहणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. सध्या मात्र जळगावच्या सराफ बाजारात अस्थिरतेचे चित्र कायम असून ग्राहकांनी खरेदीपूर्वी दरांची खातरजमा करणे आवश्यक ठरत आहे.









