हिंदी व्यंग्य साहित्याला नवे परिमाण देणारे- डॉ. शंकर पुणतांबेकर

---Advertisement---

 

जळगाव नगरीचे भूषण, प्रख्यात व्यंग्यकार, तत्वचिंतक आणि समीक्षक डॉ. शंकर पुणतांबेकर यांचे जन्मशताब्दी वर्ष (26 मे 1925 ते 25 मे 2026) साजरे होत आहे. हिंदी व्यंग्य साहित्याला स्वतंत्र आणि सशक्त “विधा” म्हणून प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी ज्यांनी आयुष्य वेचले, त्या थोर साहित्यिकाला ही अभिवादनाची वेळ आहे.

याच पार्श्वभूमीवर साहित्य भारती आणि संस्कार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने 2 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता जळगाव येथील व. वा. वाचनालयात ‘डॉ. शंकर पुणतांबेकर जन्मशताब्दी अभिवादन समारंभ’ आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात त्यांच्या साहित्यिक आणि सामाजिक कार्याचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे.

हरिशंकर परसाईंच्या परंपरेचे खरे वारस :

हिंदी व्यंग्य साहित्याच्या क्षेत्रात हरिशंकर परसाई यांच्यानंतर ज्यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते, ते म्हणजे डॉ. शंकर पुणतांबेकर. परसाई यांच्या व्यंग्यपरंपरेचा वारसा पुढे नेणारे आणि त्या प्रवाहाला तात्त्विक अधिष्ठान देणारे पुणतांबेकर सर एकमेव ठरतात. त्यांनी व्यंग्याला केवळ हास्याचा प्रकार न मानता त्याला गंभीर चिंतनाची दिशा दिली. समाजातील विसंगती, दांभिकता आणि मूल्यांचे ऱ्हास यावर त्यांनी प्रखर भाष्य केले. त्यांच्या लेखनात नेहमीच ‘भारत’ आणि ‘इंडिया’ यांच्यातील अंतर्गत संघर्ष अधोरेखित होतो.

साहित्यसंपदा आणि वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग

त्यांनी 30 हून अधिक व्यंग्य कथासंग्रह लिहिले. शतरंज के खिलाडी, कैक्टस के काटे, प्रेमविवाह, अंगूर खट्टे नहीं हैं, दुर्घटना से दुर्घटना तक, बा अदब बे मुलाहजा यांसारख्या पुस्तकांनी हिंदी व्यंग्याला नवी धार दिली. त्यांची एक मंत्री स्वर्ग लोक में आणि जहाँ देवता मरते हैं ही कादंबरी विशेष उल्लेखनीय आहे. Where God Dies या इंग्रजी आवृत्तीमुळे ही कादंबरी आंतरराष्ट्रीय स्तरावरही पोहोचली. हिंदी आणि इंग्रजीत एकाच वेळी साकारलेली ही व्यंग्यकादंबरी हा त्या काळातील अभिनव प्रयोग मानला जातो. त्यांचे आत्मचरित्र बिखरे पन्ने हे चिंतनात्मक लेखनाचे उत्तम उदाहरण आहे. विविध दैनिके आणि नियतकालिकांमध्ये त्यांनी सातत्याने स्तंभलेखन केले. जळगाव आणि दिल्ली येथील आकाशवाणीवरून संस्कृती, धर्म आणि साहित्य विषयक त्यांच्या विचारपुष्प लेखनानेही मोठी छाप पाडली.

‘हिंदी व्यंग्य अमरकोश’ – एकमेव कार्य

डॉ. पुणतांबेकर यांनी हिंदी साहित्याला दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे हिंदी व्यंग्य अमरकोश. संपूर्ण जगात हिंदी भाषेत व्यंग्य शब्दकोशाचा हा अद्वितीय आणि एकमेव प्रयत्न मानला जातो. या कोशाच्या निर्मितीसाठी त्यांनी तब्बल बारा वर्षे आयुष्य समर्पित केले. या अमरकोशातील शब्दार्थ विनोदी असले तरी ते खोल सामाजिक वास्तव उलगडतात.

उदाहरणार्थ –
आयकर – आमदनी कमाने के अपराध का दंड
चिंता – मनसर्पिणी जिसके जहर से भगवान और बंदूक जिंदा है
अशा व्याख्यांमधून त्यांचे तात्त्विक आणि सामाजिक भान स्पष्ट दिसते.

शैक्षणिक आणि सामाजिक योगदान:

त्यांनी पुणे विद्यापीठातून पीएच.डी. प्राप्त केली. मू. जे. महाविद्यालयात हिंदी विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना अनेक विद्यार्थ्यांना एम.फिल. आणि पीएच.डी.साठी मार्गदर्शन केले. जळगाव संस्कार भारतीचे जवळपास २५ वर्षे अध्यक्ष म्हणून त्यांनी सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केले.

पुरस्कार आणि गौरव:

त्यांच्या साहित्यसेवेबद्दल त्यांना व्यंग्यश्री, अट्टहास, वासुदेव होळीकर पुरस्कार तसेच महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा जीवनगौरव पुरस्कार यांसह अनेक सन्मानांनी गौरविण्यात आले.

अखेरपर्यंत कार्यरत असलेले व्यक्तिमत्त्व:

९०-९१ वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य लाभलेले डॉ. पुणतांबेकर शेवटपर्यंत कार्यरत होते. “कार्यमग्न जीवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती” या उक्तीप्रमाणे त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत लेखन आणि वाचन सुरू ठेवले.

हिंदी व्यंग्य साहित्याला स्वतंत्र ओळख देणारे, त्याला तात्त्विक अधिष्ठान प्रदान करणारे आणि समाजमनाला विचारप्रवृत्त करणारे हे थोर साहित्यिक आजही त्यांच्या लेखनातून जिवंत आहेत. जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---