---Advertisement---
सावदा नगरपालिकेची निवडणुकीनंतरची पहिली सर्वसाधारण सभा आज चांगलीच गाजली. सभेत पटलावरील तब्बल 27 विषयांना मंजुरी देण्यात आली, मात्र या बैठकीत काही मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचे पाहायला मिळाले. नगराध्यक्षा रेणुका पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. सभेच्या सुरुवातीला माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर सभेतील कामकाजाला सुरुवात झाली आणि सर्व 27 विषयांवर चर्चा करत त्यांना मंजुरी देण्यात आली.
मात्र राष्ट्रवादी गटाच्या नगरसेविका सीमा लोखंडे आणि नगरसेवक विशाल तायडे यांनी दलित वस्ती योजनेतील एकही काम पटलावर का आणले नाही असा सवाल उपस्थित करत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. यावर शिक्षण सभापती सचिन बऱ्हाटे यांनी संबंधित प्रभागातील कामे आधी सुचवली असती तर ती सभेत आणता आली असती असे सांगितले. यानंतर या मुद्द्यावर सभागृहात जोरदार चर्चा रंगली. नगराध्यक्षा रेणुका पाटील यांनीही मागासवर्गीय प्रभागातील विकासकामांसाठी लवकरच प्रस्ताव आणले जातील आणि त्या भागाचा चेहरा बदलू असे आश्वासन दिले.
दरम्यान राष्ट्रवादी गटनेते राजेश वानखेडे यांनी शाळांच्या मैदान विकास कामांबाबत प्रश्न उपस्थित करत निकृष्ट कामाचा आरोप केला. यावर मुख्याधिकारी भूषण वर्मा यांनी हे काम जिल्हा परिषद अंतर्गत असल्याचे सांगत चौकशीसाठी पत्र पाठवले असल्याची माहिती दिली. तसेच शहरातील काही जागांना एनए परवानगी देताना नाल्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही करण्यात आला. याचदरम्यान काही कामांमध्ये कमिशन घेतल्याचा मुद्दा उपस्थित होताच सभागृहात वातावरण तापले.
सत्ताधारी गटातील नगरसेविका प्रतीक्षा भंगाळे आणि उपनगराध्यक्ष फिरोजखान पठाण यांनी “संपूर्ण सभागृहावर आरोप करू नका, नाव घेऊन बोला” असे सांगत विरोधकांना आव्हान दिले. या मुद्द्यावरून काही काळ सभागृहात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. मात्र काही नगरसेवकांनी मध्यस्थी केल्यानंतर पुन्हा सभेचे कामकाज सुरळीत सुरू झाले.
दरम्यान सावदा शहरात साहित्यिक व.पू. होले यांच्या नावाने योगा सेंटर किंवा अभ्यासिका सुरू करण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला. तसेच विश्रामगृहाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा विषय पुन्हा मांडण्यात आला. सभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सर्व नगरसेवक तसेच पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.









