जळगाव महानगरपालिकेत स्वीकृत सदस्यांच्या पदावरून राजकीय पेच; मतभेदांमुळे स्वीकृत नगरसेवकांची निवड लांबणीवर ?

---Advertisement---

 

महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांच्या सात जागांसाठी सुरू असलेली निवड प्रक्रिया राजकीय मतभेदांमुळे लांबली आहे. सुरुवातीला निश्चित वेळापत्रकानुसार ही प्रक्रिया १७ तारखेला पूर्ण होणार होती, मात्र पक्षांमध्ये एकमत न झाल्याने प्रशासनाने ही प्रक्रिया आठवडाभर पुढे ढकलली आहे. आता नव्या वेळापत्रकानुसार २५ तारखेपर्यंत नामनिर्देशन प्रस्ताव मागवण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या सात जागांसाठी तीन प्रमुख पक्षांमध्ये वाटप निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार चार, दोन आणि एक अशा जागांचे विभाजन करण्यात आले आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला त्यांच्या संख्याबळानुसार एक जागा निश्चित झाली आहे.

दरम्यान, इच्छुकांची संख्या वाढत असल्याने आणि अंतर्गत नाराजी उफाळून आल्याने गटनेत्यांनी प्रशासनाकडे मुदतवाढ मागितली होती. महापौर दीपमाला काळे यांच्या सूचनेनुसार प्रशासनाने ही मागणी मान्य केली आहे.

नवीन वेळापत्रकानुसार, २५ तारखेपर्यंत दुपारी ४ वाजेपर्यंत नामनिर्देशन प्रस्ताव सादर करायचे असून २७ तारखेला आयुक्तांच्या दालनात अंतिम बैठकीत या नावांवर शिक्कामोर्तब होणार आहे.

जळगावात राजकीय घडामोडींना वेग आला असून शिंदे गटात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या पाठिंब्याने दोन नावे निश्चित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच भाजपच्या बैठकीत मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

याशिवाय ठाकरे गटाकडून महानगराध्यक्ष शरद तायडे यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. एकूणच, वाढते राजकीय तणाव आणि अंतर्गत मतभेद यामुळे ही निवड प्रक्रिया अधिकच रंगतदार बनली असून आता सर्वांचे लक्ष २५ आणि २७ तारखेकडे लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---