---Advertisement---
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड समोर आली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याला अटक झाल्यानंतर या प्रकरणाला वेग आला. खरातसोबतचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या व्हिडीओमध्ये रुपाली चाकणकर या खरात याचे पाद्यपूजन करताना तसेच त्याचे कौतुक करताना दिसत असल्याने मोठा वाद निर्माण झाला होता.या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून सातत्याने चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. प्रकरण चिघळत असतानाच अखेर त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाकणकर यांनी आपला राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे सादर केला आहे. तसेच पक्षातील महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान, या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राजीनामा देण्याच्या सूचना केल्याची चर्चा होती. मात्र, अंतिम निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, अशोक खरात याच्यावर शेकडो महिलांचा लैंगिक छळ केल्याचे गंभीर आरोप आहेत. गुंगीचं औषध देऊन आणि संमोहन करून महिलांवर अत्याचार केल्याचा आरोप असून, या प्रकरणात पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागले आहेत.या प्रकरणात खरातचे अनेक व्हिडीओ, तसेच दोन लॅपटॉप पोलिसांनी जप्त केले असून तपास अधिक वेगाने सुरू आहे. या सर्व घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.









