---Advertisement---
चाळीसगाव तालुक्यातील जुनोने शिवारात अवैध गावठी दारू निर्मितीवर पोलिसांनी धडक कारवाई करत एकाला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात कच्चे रसायन जप्त करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, जुनोने येथील कुंडाच्या नाल्यात एका शेताजवळ गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी कच्चे रसायन भिजत ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ छापा टाकला.
पोलीस उपनिरीक्षक राहुल राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पंचांसह घटनास्थळी कारवाई केली. या वेळी दगडू सदाशिव गायकवाड (वय ५०, रा. जुनोने, ता. चाळीसगाव) याला जागीच पकडण्यात आले.
आरोपीच्या ताब्यातून सुमारे ३५० लिटर कच्चे रसायन जप्त करण्यात आले. या रसायनात गुळ, नवसागर आणि एरंडी यांचे मिश्रण असल्याचे समोर आले असून, जप्त मालाची किंमत सुमारे १२ हजार २५० रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
पोलिसांनी नमुना म्हणून काही रसायन सीलबंद केले असून उर्वरित साहित्य घटनास्थळीच नष्ट करण्यात आले. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(फ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, बेकायदेशीर धंद्यांवर पोलिसांची कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.









