जमीन गैरप्रकरणात दाखल गुन्हा हा पूर्णपणे राजकीय सूडबुद्धीने; एकनाथ खडसेंनी सर्व आरोप फेटाळले…!

---Advertisement---

 

मानपुर येथील जमीन प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी या प्रकरणावर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. बोदवड पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेला गुन्हा हा पूर्णपणे राजकीय सूडबुद्धीने प्रेरित असल्याचा आरोप त्यांनी करत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

एकनाथ खडसे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, या जमीन व्यवहारांमध्ये त्यांचा कोणताही थेट किंवा दुरान्वये संबंध नाही. संबंधित जमीन त्यांच्या कन्या शारदा खडसे यांनी कायदेशीर प्रक्रियेनुसार खरेदी केली असल्याचे त्यांनी नमूद केले. जमीन खरेदी करताना ती वर्ग-१ (Class 1) स्वरूपाची असल्यानेच व्यवहार करण्यात आला, असेही त्यांनी स्पष्ट केले.

याचबरोबर सातबारा उताऱ्यावर संबंधित जमीन महार वतनाची नसून वर्ग-१ जमीन असल्याचे नमूद आहे, असे सांगत खडसेंनी तक्रारदारांवर शासनाची दिशाभूल केल्याचा आरोप केला. इतकेच नव्हे, तर यापूर्वी विधानसभेतही हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर महसूल मंत्र्यांनीही ही बाब स्पष्ट केल्याचा दावा त्यांनी केला.

या प्रकरणात साखर कारखान्याच्या नावाखाली जमीन खरेदी केल्याचा आरोप होत असताना खडसे यांनी वेगळाच खुलासा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ही जमीन साखर कारखान्यासाठी नव्हे तर इथेनॉल प्रकल्प उभारण्यासाठी खाजगीरित्या आणि नियमानुसार खरेदी करण्यात आली होती. त्यामुळे फसवणूक किंवा अन्य कोणताही गैरप्रकार झालेला नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

दरम्यान, या प्रकरणात तब्बल २४ वर्षांनंतर गुन्हा दाखल करण्यात आल्याबाबतही खडसे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. एवढ्या कालावधीनंतर अचानक कारवाई का करण्यात आली, यामागे राजकीय हेतू असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. केवळ राजकीय दबाव आणि त्रास देण्याच्या उद्देशानेच हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

एकीकडे तक्रारदारांनी फसवणूक आणि ॲट्रॉसिटीचा आरोप करत गुन्हा दाखल केला असताना, दुसरीकडे खडसे यांनी सर्व आरोप फेटाळून लावत हा संपूर्ण प्रकार राजकीय सूडाचा भाग असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणात नेमके सत्य काय आहे, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून पुढील तपासात काय निष्पन्न होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---